बारामतीतील गोविंदबागेत दिवाळी पाडवा गेली ५० वर्षे साजरा होत असला तरी सर्वांचे डोळे अजित पवार येतात का याकडे लागले होते. परंतू, अजित पवार बारामतीत असूनही आले नाहीत. जुन्नरचे आमदार अतुल बेनके कार्यकर्त्यांना घेऊन शरद पवार यांच्या भेटीला बारामतीत आले होते. यानंतर शरद पवारांनी माध्यमांना दिवाळी पाडवा कार्यक्रमानिमित्त प्रतिक्रिया दिली आहे.
गोविंदबागेत दिवाळी पाडवा साजरा करण्याची ही गेली ५० वर्षांपासूनची पद्धत आहेत. पाडव्याच्या दिवशी लोक बारामतीत येतात. गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे. यंदाचे वर्ष वेगळे आहे. कारण यापूर्वी लोक पाडव्यासाठी यायचे, आता पाडव्यापूर्वी येतात आणि सांगतात पाडव्याच्या दिवशी गर्दी खूप असते म्हणून आधीच भेटून जातो, असे शरद पवार म्हणाले.
आजकाल दोन दिवस आधीही लोक येतात. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण इथून लोक आले आणि शुभेच्छा दिल्या. यावर्षी आलेल्यांपैकी 70 टक्के लोक तरुण होते. हे या वेळचे वैशिष्ट्य आहे. तरुणांच्या भवितव्यासाठी काय करता येईल त्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन पवार यांनी दिले.
मराठा आरक्षणावर बोलताना पवारांनी मराठा तरुणांची भावना तीव्र आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम करू, असे म्हटले. याचबरोबर त्यांच्या व्हायरल झालेल्या जात प्रमाणपत्रावर देखील त्यांनी भाष्य केले. माझी जात कोणती हे अवघ्या जगाला माहिती आहे. मराठा ओबीसीत वाद नाही, मात्र काही लोक तसं वातावरण तयार करत आहेत, असा आरोप पवारांनी केला.
अजित पवारांच्या आजारपणावर...
रोहित पवार हे बीडला आहेत. तिकडच्या लोकांनी मला सांगितलं त्यांची तिकडे यात्रा सुरु आहे. मात्र काहींचे व्यक्तीगत आजार असतात. वैयक्तिक काम असतात त्यामुळे काही जण आले नसतील, असा टोला शरद पवार यांनी अजित पवार न आल्यावरून लगावला.