नंदकिशोर नारे/ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 28 - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गंत राज्यात मागील दोन वर्षांपासून अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानुसार वाशिम शहर ३१ मार्च २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने व तसे शासनाचे आदेश असल्याने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी आता उघडयावर शौचास जाणाऱ्यांचे फोटो शहरातील प्रमुख चौकात लावण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत उघडयावर शौचालयास जाणाऱ्यांचे नावे त्या परिसरात जाहीर केल्या जात होते आता फोटो लागणार असल्याने उघडयावर शौचास जाणाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. वाशिम शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी वाशिम नगरपरिषदेकडून एकूण ३६७० लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम करण्याकरीता अनुदान देण्यात आलेले आहे, त्यापैकी आॅगस्ट २०१६ पर्यंत फक्त ४२७ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले होते. अभियानाला गती देत २५ डिसेंबरपर्यंत ११६९ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे.शौचालय बांधणीचा वेग वाढविण्यासाठी नगरपरिषदेने केलेली उपाय योजनाअनुदान घेतलेल्यांनी शौचालयाचे बांधकाम केले किंवा नाही हे पाहण्यासाठी ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला १०० लाभार्थ्यांची यादी दिली आहे. कर्मचारा्यांची टीम दररोज पाहणी करुन या कामाचा आढावा घेत आहे. वाशिम नगरपरिषदेच्या प्रत्येक महिला बचत गटांना सुध्दा वाशिम शहर हागणदारीमुक्त करण्याकरिता त्यांच्या भागातील २५ लाभार्थ्यांची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक बचत गट दररोज जनजागृती करुन आढावा घेत आहे. नगरपरिषदेच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकास , शिक्षकास सुध्दा २५ लाभार्थ्यांची यादी देण्यात आली आहे. तसेच शाळेत ज्या पाल्यांच्या घरी शौचालय नाही अशांना बोलावून पालक सभेचे आयोजन करुन शौचालयाचे महत्व विषद करीत आहेत. यासह प्रत्येक वार्डात विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली, कलापथकांच्यावतिने जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.शौचालय नसलेल्यांना मुकावे लागणार या सुविधांपासूनजे लाभार्थी शौचालय बांधणार नाहीत त्यांच्या घरातील नळ कनेक्शन बंद करण्यात येणार आहे. न.प. सेवा व शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. संबधित लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून अशा लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे.शहरातील हागणदारीमुक्त होण्यासाठी नाइलाजास्तव कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी अनुदान घेऊन शौचालय बांधले नाहीत त्यांनी ते त्वरित बांधून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीपासून वाचावे. उदयापासून (२९ डिसेंबर) उघडयावर शौचास जाणाऱ्यांचे फोटो मात्र चौकात झळकणारच आहेत. नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे.- गणेश शेटेमुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम
आता चौकात झळकतील उघडयावर शौचास जाणाऱ्यांचे फोटो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2016 5:52 PM