लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडाच्या काळात उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना रिक्षावाला, तर त्यांच्या गटातील काही आमदारांना ते एकेकाळी वॉचमन, पानटपरीवाला, भाजीवाला असल्याचे हिणवले होते. या खिल्लीला उत्तर म्हणून या समाजघटकांसाठी कल्याणाची योजना शिंदे सरकार आणणार आहे. माजी मंत्री व शिंदे गटाचे उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकारांशीे बोलताना याबाबत सूतोवाच केले.
राज्यात अंदाजे ८ लाख ३२ हजार रिक्षा तर ९० हजार टॅक्सी परवानाधारक आहेत. हा कष्टकरी वर्ग सामाजिक व कल्याणकारी योजनांपासून वंचित आहे. या रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्रात तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना राबविण्याकरिता मंडळ स्थापन करण्याची मागणी सामंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.
याबाबतचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेऊन या कष्टकरी जनतेला दिलासा देणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
सर्वसामान्यांना शिंदे सरकार दिलासा देणार
- राज्यातील भाजी व्यावसायिकांना टोलमुक्ती देऊन या वर्गाला मोठा दिलासा देण्याचा निर्णय शिंदे सरकार घेण्याच्या तयारीत आहे.
- सुरक्षारक्षक यांच्या वेतनात मोठी वेतनवाढ करण्याबरोबरच त्यांना निवृत्तिवेतन देण्याचा शिंदे सरकारचा मानस आहे.
- देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासोबतच टपरीधारकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शिंदे घेणार असल्याची माहितीही आ. सामंत यांनी दिली.