पुणे : राज्यातील सर्व कारागृहांमधील बंदिवानांसाठी जानेवारीपासून योग अभ्यास वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. प्रशिक्षण पूर्र्ण झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात येईल. उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्यांना तीन महिन्यांपर्यंत शिक्षेमध्ये सूट देण्यात येईल, अशी माहिती कारागृह विभागाचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.प्रशिक्षणाची सुरुवात येरवडा मध्यवर्ती कारागृहामधून करण्यात आली असून शुक्रवारी दुपारी स्वत: उपाध्याय यांनी कैद्यांना योग कशाला म्हणावे याची माहिती दिली. यासोबतच त्याचे शारिरीक, मानसिक आणि सामाजिक परिणाम त्यांनी सांगितले. या प्रशिक्षण वर्गांद्वारे कैद्यांच्या तन आणि मनाची शक्ती वाढवण्यासोबत त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडू शकेल, असेही उपाध्याय यांनी सांगितले.कैद्यांना योगाच्या परिभाषेपासून ते प्रात्यक्षिकांपर्यंतची माहिती तसेच योगाचे शास्त्रीय आधार, आसन, प्राणायाम, ध्यान याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी लोणावळा येथील कैवल्यधाम संस्था मदत करणार आहे. आठवड्यामधून एक दिवस स्वत: उपाध्याय प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षित झालेल्या कैद्यांमार्फत अन्य कैद्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कारागृहाच्या प्रमुखांना वर्षातून एकदा तीन महिन्यांची शिक्षा माफ करण्याचे अधिकार असतात. प्रशिक्षण देऊन कैद्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. उत्तीर्ण होणाऱ्या कैद्यांना गुणांनुसार शिक्षेत माफी दिली जाईल.
कैद्यांना आता योगाभ्यासाचे धडे देणार
By admin | Published: November 30, 2015 2:54 AM