विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा ज्या पद्धतीने शिवसेनेला वागणूक देत आहे ती पाहता लोकसभा किंवा कोणत्याही निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी संपर्क नेत्यांच्या बैठकीत दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला स्थान मिळाले नाही. एवढेच नव्हे तर मित्र पक्ष म्हणून कोणत्याही बाबतीत विश्वासात घेतले जात नाही. राज्यातही भाजपा-शिवसेनेतील संबंध ताणले गेले आहेत. ‘एनडीएचा मृत्यू झाला आहे’, अशी प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी रविवारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर दिली होती.या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी संपर्क नेते, संपर्क प्रमुखांच्या घेतलेल्या बैठकीत ‘एकला चलो रे’चा आदेश दिल्याची माहिती आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजपाने एकत्रितपणे लढविली होती, मात्र विधानसभा निवडणूक दोघेही स्वबळावर लढले होते.निवडणुका जवळ येतील तशी शिवसेनेची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाईल. त्यांना घाबरण्याचे काहीही कारण नाही. तालुक्यातालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे. थेट बूथपर्यंत नेटवर्क तयार करा. उद्या स्वबळावर लढायचे म्हटले तर हीच यंत्रणा कामास येईल, असे ठाकरे म्हणाले.
आता स्वबळाच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 4:43 AM