नांदेड : आगमी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीत कोणासोबत आघाडी करायची, हा निर्णय स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असेल. मात्र, यापुढे राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचा ‘प्रासंगिक करार’च असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगर पालिका निवडणुकीची काँग्रेसने जय्यत तयारी सुरू केली असून २७ डिसेंबर रोजी मुंबईत राज्यस्तरीय बैठक होत आहे. या निवडणुकांत राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का, या प्रश्नावर खा. चव्हाण म्हणाले, काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. शिवाय, नुकतीच झालेली विधान परिषदेची निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढविली. त्यामुळे आघाडी करायची की नाही हे त्या-त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर अवलंबून राहील. नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा प्रयोग फसला असल्याचे सांगून ते म्हमाले, बहुमत एका पक्षाचे आणि नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा असे अनेक ठिकाणचे चित्र आहे. त्यातून पालिकांच्या कामकाजात अडचणी निर्माण होणार असल्याच खा. चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)‘दंगल’ करमुक्त करासामाजिक व कौटुंबिक संदेश देणारा आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणीही खा. चव्हाण यांनी केली. मुला-मुलातील भेद दूर करण्याचा तसेच मुलीही मुलापेक्षा कमी नाहीत, असा संदेश ‘दंगल’मधून देण्यात आला आहे. हा संदेश समाज स्वास्थ्यासाठी उपयुक्त असून हा चित्रपट करमुक्त करणे गरजेचे आहे. देशातील इतर राज्यांनी ‘दंगल’ करमुक्त केला असून महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे ते म्हणाले.
यापुढे राष्ट्रवादीशी ‘प्रासंगिक करार’!
By admin | Published: December 27, 2016 12:59 AM