मुंबई : मुंबईत लाखो महिला दररोज रेल्वेने प्रवास करतात. स्थानकावरील स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांना लघवीला लागल्यावर त्यांची कुचंबणा होते. महिलांना सुरक्षित आणि स्वच्छ स्वच्छतागृह मिळावे म्हणून लढणारी ‘राईट टू पी’ची चमू आता रेल्वे प्रशासनाबरोबर काम करणार आहे.मुंबई आणि नवी मुंबईतील ८७ स्थानकांचे सर्वेक्षण तुळजापूरच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स’मधील पल्लवी आणि पर्णिका या दोघींनी ‘राईट टू पी’ आणि ‘कोरो’बरोबर मिळून केले. या सर्वेक्षणात समोर आलेले सत्य रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यापुढे मांडले. स्थानकावरील महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था सविस्तरपणे मांडण्यात आली. त्यावर सुरेश प्रभू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आता मुंबईतील स्थानकांवर ‘आरटीपी’ टीम रेल्वे प्रशासनाबरोबर काम करणार आहे. या आठवड्यात मुंबई रेल्वे प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर कशा प्रकारे काम करायचे याची दिशा ठरवली जाईल, असे आरटीपी कार्यकर्त्या सुप्रिया सोनार यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेची २३, मध्य रेल्वेची ३२ आणि हार्बर रेल्वेच्या २६ स्थानकांची माहिती एकत्र करण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकावरील समस्या वेगळ्या आहेत. पण, अनेक स्थानकांवर असलेल्या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे महिला स्वच्छतागृहे ही स्थानकांच्या एका कोपऱ्यात आहेत. महिला स्वच्छतागृहांच्या जवळ गर्दी नसते. त्यामुळे येथे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक स्थानकावर समान पैसे आकारले जात नाहीत. अनेक स्थानकांवर महिला स्वच्छतागृहे बंद असतात. तर, काही ठिकाणी पुरुष महिला स्वच्छतागृहांपाशी बसलेले असतात. अनेकदा विक्रेते स्वच्छतागृहांत त्यांचे सामान ठेवतात, या समस्या रेल्वेमंत्र्यांना सांगण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
आता लढा स्थानकांवरील स्वच्छतागृहांसाठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2016 4:31 AM