ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 : आत्मशांती, घरशांतीसाठी तसेच भरभराट व्हावी, यासाठी शनी यंत्र, बारा राशी यंत्र यांची विक्री सध्या सर्वत्र होत असताना दिसतात़ त्याच्या जाहिरातीही मोठ्या प्रमाणावर झळकताना दिसून येत असतात़ त्यांना असलेली मागणी लक्षात घेऊन आता शनी यंत्राचेही बनावट उत्पादन होऊ लागले असून त्याची रस्त्यावर विक्री होऊ लागल्याचे दिसून येत आहे़ बनावट शनियंत्र बनवून कॉपी राईटचा भंग केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे़
प्रशांत पतंग बाबर (वय २७, रा़ जयप्रकाशनगर, विद्याविहार (ईस्ट), मुंबई) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी अभय रिखबचंद बाफना (वय ४०, रा़ जामखेड, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे़ नेवासा तालुक्यातील सोनाई येथील सुजित किशोरीलाल बिहाणी यांच्या फर्ममार्फ नवग्रह यंत्र, शनि यंत्र, बारा राशी यंत्र याचे उत्पादन व विक्री केली जाते़ याच्या उत्पादनाची कोणी बनावट उत्पादने करु नये, यासाठी बाफना यांना त्याचा शोध घेण्याचे काम दिले आहे़ बिहाणी यांच्या उत्पादनाची हुबेहुब नक्कल करुन चांदीसारखे दिसणा-या शनि यंत्र तयार करुन ते चंदननगर येथील भाजी मार्केटजवळील रस्त्यावर विक्री होत असल्याची माहिती बाफना यांना मिळाली़ त्यांनी पोलिसांच्या मदतीने तेथे छापा घालून प्रशांत बाबर याला पकडले़ त्याच्याकडे २७ हजार रुपयांचे १ हजार ३५० शनियंत्र सापडली आहेत़ बाबर याला मंगळवारी सकाळी अटक करुन न्यायालयात हजर केले़ सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी सांगितले की, आरोपीकडे मिळून आलेले बनावट शनियंत्र त्याने कोठे बनविण्यात आले आहे़ त्यासाठी कोणी मदत केली़ त्याचा तपास करुन त्यांना अटक करायची आहे़ आरोपींने आणखी काही बनावट शनियंत्र बनविलेले असल्याची शक्यता आहे़ आरोपी हा मुळचा मुंबईचा राहणारा असल्याने चंदननगर परिसरात कोणी साथीदार असण्याची शक्यता आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून मुंबईला जाऊन तपास करणे आवश्यक असल्याने पोलीस कोठडीची गरज असल्याचे सांगितले. सरकार पक्षाची मागणी ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.