वर्धा : गोवंश हत्याबंदी कायदा केंद्र सरकारने देशभरात लागू करावा, ही भूमिका घेऊन देशभरातील सर्वोदयी व गांधीवादी आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार आश्रमात दाखल झाले आहेत. तेथे सोमवारपासून याबाबत विचारमंथन सुरू झाले असून या तीन दिवसीय चर्चासत्राच्या शेवटी दिल्लीतील सत्याग्रहाचे स्वरुप निश्चित करण्यात येणार आहे.विनोबांची मागणी देशात गोवंश हत्याबंदीची होती. या अनुषंगाने आता हे आंदोलन दिल्लीत नेणे भाग आहे, यावर सर्व गांधीवादी आणि सर्वोदयी नेतेमंडळींमध्ये एकमत झाले. याच अनुषंगाने सत्याग्रहाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ही मंडळी पवनार आश्रमात एकत्र आली आहेत.सोमवारी पहिल्या दिवशी विनोबांचे सहकारी मुंबईचे कांती शाह यांच्यासह डॉ. रामजी सिंग व टोटा लक्ष्मणराव यांनी तीन पेपरचे सादरीकरण केले. दोन पेपरच्या माध्यमातून गोवंश रक्षा देशासाठी का आवश्यक आहे, याकडे लक्ष वेधले. तर, फैजल खान हे गाईचा प्रश्न कसा हाताळावा, यावर चर्चा घडवून आणली. पहिल्या सत्राचे अध्यक्षस्थान सर्व सेवा संघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमरनाथ यांनी भूषविले. गांधीवादी संघटनांचे सुमारे ७० प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभागी झाले आहेत.
गोवंश हत्याबंदीसाठी आता दिल्लीत सत्याग्रह
By admin | Published: August 18, 2015 1:24 AM