ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २३ : राज्यभरातील वीजग्राहकांसाठी महावितरणने नुकत्याच उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत मोबाईल अॅपला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. आजपर्यंत ४ लाख ३८ हजार ४३९ ग्राहकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. वीज ग्राहकांना विविध सेवा ऑनलाईन, विशेषत: मोबाईलवर उपलब्ध व्हाव्यात म्हणून महावितरणने वीजग्राहकांना मोबाईल अॅप सुविधा दिलेली आहे.या अॅपवर वीजबिल पाहणे, ते ऑनलाईन भरणे आदी महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध केल्या आहेत. बिले भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डसोबतच मोबाईल वॅलेट, कॅश कार्डचा वापर करता येतो. एकापेक्षा जास्त वीज कनेक्शन असतील तर ते एकाच खात्यातून (युजरनेम) हाताळता येतात. विजेसंबंधीच्या सर्व प्रकारच्या तक्रारी नोंदविणे तसेच त्याची सोडवणूक झाली की नाही, याची खातरजमा करता येते. यापुढे ग्राहकांना मोबाईलवर वीजबिलाचे संदेश पाठवले जाणार आहेत. त्यासाठी ग्राहकांना त्यांचे मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नोंदविण्याची व ते अद्यावत करण्याची सुविधा या अॅपमध्ये दिली आहे.
ज्या ग्राहकांचे मीटर रीडिंग महावितरणला मिळालेले नाही, अशा ग्राहकांना कंपनीकडून नोंदविलेल्या मोबाईलवर संदेश जाईल. त्यानंतर त्या ग्राहकांना आपल्या मीटरचा फोटो काढून रीडिंग नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल. यामुळे वीजबिलांमधील चुका कमी होऊन ग्राहक तक्रारीही कमी होतील. यात नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे हे मोबाईल अॅप ग्राहकप्रिय ठरले असून, आतापर्यंत ४ लाख ३८ हजार ४३९ ग्राहकांनी ते डाऊनलोड केले आहे.
वीज ग्राहकांसह महावितरणने कर्मचाऱ्यांसाठीही मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. या अॅपवर ग्राहकांना सेवांबद्दलचा अभिप्राय देखील नोंदवता येतो. ग्राहकांसाठीचे अॅप 'गुगल प्लेस्टोअर', 'अॅपल अॅप स्टोअर', 'विंडोज स्टोअर' तसेच महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ते अँड्रॉईड, विंडोज व आयओएस ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करते.