मुंबई : शिवसेनेला आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)आता नॉट रिचेबल झाले आहेत. भास्कर जाधव यांचा फोन लागत नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण झाले आहे. भास्कर जाधव सुद्धा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. यातत आता भास्कर जाधव यांचा फोन लागत नाही. ते नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे भास्कर जाधव सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे, आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर आजही कायम आहोत, जे गेलेत त्यांचा विचार करु नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभागप्रमुखांना सांगितले आहे. विभागावर मेळावे लावा, शाखा शाखा पिंजून काढा असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी काल संध्याकाळी सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलवली होती. त्यावेळी त्यांनी हा आदेश दिला आहे.