मुंबई : ‘भारतमाता की जय’ वरून गेले काही दिवस विधानसभेत गदारोळ सुरू असतानाच, आज तिरंग्यावरून गोंधळ झाला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत तिरंगा झेंड्याचा अपमान केल्याचा आरोप करीत, भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी आज सभागृहात गदारोळ केला. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक होत, आमनेसामने आल्याने झालेल्या गोंधळात कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. प्रश्नोत्तराचा तास संपताच भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी सभागृहात विरोधी पक्ष सदस्यांनी तिरंगा झेंडे फडकावले, तेव्हा आव्हाड यांनी झेंड्याने तोंड पुसल्याचे व्हिडीओ क्लिपिंग उपलब्ध असल्याचा दावा केला. आव्हाड यांच्याविरुद्ध कारवाईची मागणीही त्यांनी केली. भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी ‘भारतमाता की जय’च्या घोषणा दिल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्यही वेलमध्ये उतरले. सभागृहातील कामकाजाचे मोबाइलवर शूटिंग होत असेल, तर ते अत्यंत आक्षेपार्ह आहे. तसे करणारे आमदार आणि त्यांना तसे करण्यास सांगणारे मंत्री यांची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तिरंगा उलटा फडकविण्यात आला होता, असे त्यांनी म्हणताच भाजपाचे सदस्य संतप्त होत पुढे आले. जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूंकडून सुरू झाली. तहकुबीनंतर कामकाज पुन्हा सुरू झाले, तरीही गदारोळ सुरूच राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योगासन करताना तिरंगा झेंड्याने चेहरा पुसत असल्याचे फोटो विरोधी सदस्यांनी सभागृहात दाखविले. हा आरोप अत्यंत निराधार असल्याचे सत्तारूढ सदस्य म्हणत होते. या गदारोळात आणखी अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब झाले. शेवटी, आपण ते क्लिपिंग तपासून निर्णय घेऊ, असे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
आता तिरंग्यावरून गदारोळ
By admin | Published: April 06, 2016 5:03 AM