IRCTC-MSRTC Booking: एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी प्रवासासाठी आता रेल्वेच्या साइटवरून तिकीट बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे एसटी तिकीट बुकिंगसाठी एक अधिकचा पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध झाला आहे. या सुविधेसाठी एसटी महामंडळ आणि रेल्वेत करार झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या बसेसचे ऑनलाईन आरक्षण आता रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) च्या वेबसाईटवरुन करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आयआरसीटीसीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळ आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशन यांच्यात एक सामजंस्य करार करण्यात आला.
IRCTC वरुन MSRTC चे बुकिंगचे बुकिंग करता येणार
आयआरसीटीसीचे संकेतस्थळवरुन प्रवाशांना एसटीचे तिकीट बुकिंग करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या एसटी बसेसच्या तिकिटांचे बुकिंग करताना एसटीच्या मोबाइल अॅप आणि वेबसाईटवरुन अनेकदा प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागायचा. अनेकदा पैसे कट व्हायचे परंतू तिकीट बुक व्हायचे नाही. त्यामुळे या सेवेला खूपच कमी प्रतिसाद मिळत होता. आता ही अडचण दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने रेल्वेची तिकीट यंत्रणा सांभाळणारी कंपनी आयआरसीटीसी बरोबर सामजंस्य करार केला आहे.रेल्वे प्रवासाबरोबर एसटी प्रवासाचे नियोजन एकत्रच करता येणार आहे.
दरम्यान, भारतीय रेल्वेचे जवळपास ७५ टक्के प्रवासी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन रेल्वेची तिकीट बुकिंग करीत असतात. या प्रवाशांना आता एसटीचे तिकीट बुकिंग करण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तिकीट बुक करता येणार आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करता येईल अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.