शेफाली परब / मुंबईयुती तुटल्यामुळे मुंबई महापालिकेच्या मागील २५ वर्षांच्या इतिहासात सत्तेची समीकरणे प्रथमच बदलण्याची चिन्हे आहेत़ अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद ८४ जागा मिळवत वाढली खरी, मात्र भाजपानेही मुसंडी मारत ८२ जागा मिळवल्याने सत्ता स्थापनेसाठी म्हणजेच महापौरपदासाठी आता जोरदार रस्सीखेच सुरू होणार आहे. अपक्ष, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांना गळ लावण्यास उभय पक्षांनी सुरुवात केली आहे़ महापालिकेतील त्रिशंकू अवस्था भविष्यातील संघर्षाची नांदी ठरणारी आहे. भाजपाने आपल्याकडे चार नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा आधीच केला आहे, तर शिवसेनेकडेही दोन जणांचे समर्थन आहे़ अशा वेळी अपक्ष आणि छोटे पक्षच ‘किंगमेकर’ ठरू शकतात़ यासाठी राष्ट्रवादी ०९, समाजवादी ०६, मनसे ०७, एमआयएम दोन आणि अपक्ष पाच यांना गळ लावण्यास उभय पक्षांकडून सुरुवात झाली आहे़ महापौर शिवसेनेचाच मुंबईचा नवा महापौरच नव्हे तर भावी मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच असेल. महापालिकेत कोणाशी युती करायची ते बघू, एवढी घाई कशाला? थोडी वाट बघा. आम्ही अजून काहीही निर्णय घेतलेला नाही. मी युतीचा अद्याप विचार केलेला नाही. आम्ही नंबर एकवर आहोत एवढेच मला समजते. अधिक जागा जिंकण्याची आम्हाला अपेक्षा होती. जे काही यश मिळाले ते शिवसैनिकांचे आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.मुंबई महापालिकेत २२७ जागा असल्याने ११४ हा जादुई आकडा गाठणारा पक्षच सत्ता स्थापन करण्यासाठी दावेदार ठरतो़ मात्र या वेळी शिवसेना ८५ आणि भाजपा ८२ जागांवर विजयी झालेले आहेत़ त्यामुळे दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेची समान संधी आहे़युती तुटल्यानंतर उभय पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले आहेत़ दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढली आहेत़ त्यामुळे शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार का, याची उत्सुकता आहे़
आता संघर्ष महापौरपदाचा
By admin | Published: February 24, 2017 6:08 AM