मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते.
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत आरे आंदोलनाचे केसेस मागे घेतलात, आता नाणार आंदोलनाच्या केसेस पण परत घ्या, ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, अशी मागणी केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी आदेश देत नाणार रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यावर नितेश राणे यांनी असाच प्रतिसाद देत रहा असे खोचक आभार मानले होते.
आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदाराने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील दलितांवरील गुन्हेही माफ करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही मागणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर केली जात होती. याबाबतचे पत्रच प्रकाश गजभिए यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे.
आरे कारशेड, नाणार रिफायनरी विरोधातील आंदोलने ही पर्यावरण रक्षणासाठी होती असे कारण गुन्हे मागे घेताना देण्यात आले होते. प्रकाश गजभिये हे वेशांतर करून विधान परिषदेत येणारे आमदार म्हणून प्रसिद्ध आहेत. कधी संत, कधी छत्रपती शिवाजी महाराज तर कधी गांजलेला शेतकरी अशा वेशामध्ये ते आलेले आहेत.