- प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
गरीब मुस्लीम कुटुंबातील वधुपित्यांना मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादेत मंगळवारपासून ‘चाय पे शादी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्यानुसार येत्या १५ दिवसांत पहिली ‘चाय पे शादी’ होणार आहे. मुस्लीम समाजात अनेक गरीब कुटुंबे मुलीच्या लग्नासाठी काढलेली मोठी कर्जे आयुष्यभर फेडत बसतात, असे चित्र दिसते. हे ध्यानी घेऊनच हारून मुकाती इस्लामिक सेंटरने मुस्लीम समाजातील गरिबांसाठी ‘चाय पे शादी’ उपक्रम सुरू केला आहे. याची माहिती देताना सेंटरचे संचालक युसूफ मुकाती यांनी सांगितले की, मुस्लीम समाजात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वधुपिता गरीब असला तरी मुलीच्या लग्नाला एक ते दीड लाखापर्यंत खर्च येतोच. यात जेवण, हॉल भाड्याचा खर्च जास्त असतो. लग्नासाठी वधुपिता ८ टक्के व्याजदराने खासगी कर्ज घेतो व आयुष्यभर त्याचा भार त्याच्या डोक्यावर असतो. अनेकदा कर्जाचे हप्ते फेडता-फेडता संपूर्ण कुटुंबच कोलमोडून जाते. वधू-वर पित्यांनी इच्छा दर्शविली तर आम्ही ‘चायपे शादी’ लावून देऊ, असे त्यांनी सांगितले.‘सौतन’ चित्रपटातील ‘शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है, इसी लिए मम्मीने मेरी तुम्हे चाय पे बुलाया हैं’ हे गाणे एकेकाळी खूप गाजले. तर, वर्षभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘चाय पे चर्चा’ गाजली. आता हाच सर्वांना प्रिय असणारा आणि चर्चेतला ‘चहा’ वधूपित्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचविणार आहे.
नेमके काय करणार?- मुला-मुलींच्या लग्नकार्यासाठी केंद्रातील हॉल नि:शुल्क देणार- लग्न लावण्यासाठी काझीची व्यवस्थाही मोफत - ७०० ते ८०० पाहुण्यांसाठी मोफत चहा संपर्क : ‘हारुन मुकाती इस्लामिक सेंटर’, औरंगाबाद, मोबाईल - ९९२३१०८४८४मॅरेज ब्युरोमध्ये समुपदेशनहारून मुकाती इस्लामिक सेंटरच्या वतीने वर्षभरापासून मुस्लीम समाजासाठी विनाशुल्क ‘मॅरेज ब्युरो’ चालविला जातो. आजपर्यंत विवाहेच्छुक १२०० तरुणी व ६५० तरुणांची नोंद झाली. दर महिन्याला यातून ३० ते ३५ जणांचे विवाह जुळविले जातात.श्रीमंतांनी पुढे यावे मुस्लीम समाजातील श्रीमंतांनी आपल्या मुला-मुलीच्या लग्नासोबत गरिबांच्या मुला-मुलींचेही लग्न लावून दिले तर एक आदर्श निर्माण होईल, असे आवाहन युसूफ मुकाती यांनी केले.