अजित पवारांच्या कथित नाराजीनाट्यामुळे कालचा दिवस महाराष्ट्रात राजकीय घडामोडींचा ठरला. अजित पवार कॅबिनेट बैठकीला गेले नाहीत अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी थेट दिल्ली गाठली. तिथे बैठका करत राज्यातील पालकमंत्री पदांचे वाटप केले. अपेक्षेनुसार अजित पवारांना पुणे देण्यात आले आहे. असे असले तरी आता महामंडळांच्या वाटणीवरून शिंदे गट आणि भाजपात राजकारण रंगणार असल्याचे चित्र आहे.
भाजपाच्या प्रस्तावानुसार १०० महामंडळांपैकी ५० भाजपाकडे, २५ शिवसेनेच्या शिंदे गटाला आणि २५ राष्ट्रवादीला देण्यात येणार आहेत. मात्र, हा प्रस्ताव शिंदे गटाला मान्य नसल्याचे समजते आहे. सुत्रांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार शिंदे गट आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी ३० आणि भाजपाला ४० महामंडळे देण्यासाठी आग्रही आहे. तर राष्ट्रवादीने शिंदे गटाला जेवढी महामंडळे मिळतील तेवढीच आपल्याला हवीत अशी रट लावली आहे.
यामुळे फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे भाजपा छोट्या भावांना सांभाळून घेते का, शिंदे गटासाठी १० महामंडळे कमी घेते का असा प्रश्न उपस्थित होत आहे. या आठवड्याभरात महामंडळांचाही प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्यानंतर आता तिन्ही पक्षांमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यावर आता या तिन्ही पक्षांचा कल असणार आहे.