नाशिक-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडानंतर शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आमदारांपाठोपाठ अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. याअंतर्गत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांच्या मतदार संघात निष्ठा यात्रेचं आयोजन केलं आहे. तर संजय राऊत Sanjay Raut आज नाशिक दौऱ्यावर असून शिवसेनेतील एकनिष्ठ कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहे. नाशिकमध्ये पोहोचताच संजय राऊत यांनी आता शिवसेनेसाठी आकाश खुलं झालं असून हाडाचा कार्यकर्ता आज उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभा आहे, असं विधान केलं आहे.
"जब खोने केली लिए कुछ भी ना बचा हो तो पाने के लिए बहुत कुछ होता हैं", असं ट्विट संजय राऊत यांनी आज सकाळी केलं आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी यामागची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. "मी जे ट्विट केलं ते बरोबर आहे. आता आमच्यासाठी आकाश खुलं झालं आहे. आमच्याकडे आता मिळवण्यासारखं खूप काही आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आज उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. मातोश्रीच्या पाठित खंजीर कसा काय खुपसला जाऊ शकतो, महाराष्ट्रात शिवसेनेला संपवण्याचा कुणीही कसं काय प्रयत्न करू शकतं? अशा चिडीतून शिवसैनिक आज 'मातोश्री'च्या पाठिशी ठामपणे उभे राहत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेला संपवण्याचं हे दिल्लीचं कटकारस्थान आहे", असं संजय राऊत म्हणाले.
ठाण्यातील माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याबाबत बोलत असताना संजय राऊत यांनी ते माजी नगरसेवक आहेत. कारण सध्या महापालिकांवर प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांना नगरसेवक म्हणता येणार नाही. आगामी काळात ठाणे, मुंबई आणि इतर महापालिकांवर शिवसेनेचेच नगरसेवक निवडून येतील, असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी केला.