मुंबई : माझे सहा नगरसेवक फोडून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी अत्यंत नीच राजकारण केले आहे. मी हे कधीच विसरणार नाही. उद्धवच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली होती. त्यामुळे यापुढे हातावर नाही, तर गालावर टाळी देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावर राज यांनी आज संतप्त शब्दांत टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, सेनेने केलेल्या या राजकारणाचा राज्यातील जनतेला राग आहे. शिवसेनेला आमचे नगरसेवक हवे होते तर मी सहा कशाला सातच्या सात नगरसेवक पाठवले असते. पण प्रत्येकी पाच पाच कोटी देऊन सहा नगरसेवक फोडले. सहा जण खरेदी करण्यासाठी तीस कोटी आणले कुठून? बरं एवढं करून सोशल मीडियावर असे भासवले जात आहे की, हे सगळं मी आणि उद्धवने मिळून केले. असले दळभद्री राजकारण मी कधी केले नाही आणि मला करताही येत नाही.दुसºयांचे नगरसेवक, आमदार फोडून मला माझा पक्ष उभा करायचा नाही. त्यामुळेच मी कोणत्याही पोटनिवडणुकीत कधीही उमेदवार उभे केले नाहीत. या घटनेनंतर मला शिवसेनेचे नगरसेवक म्हणाले, शिवसेनेपेक्षा आम्ही दुसºया पक्षात असतो तर बरे झाले असते. आम्हाला आमच्या पक्षात राहून कधी काही मिळाले नाही; पण बाहेरुन आलेल्यांना पाच पाच कोटी मिळाले अशा भावना शिवसेना नगरसेवकात आहेत, असा दावाही राज यांनी केला.महापौर बंगला की पार्टी करण्याचा अड्डा?बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात करायचे असे सांगितले जाते; मात्र त्याठिकाणी परवा शिवसेनेचे नगरसेवक रात्री पार्टी करत होते. पोलिसांना खबर लागली. काही पोलिस तिकडे येत आहेत असे कळताच सगळ्यांनी तेथून पळ काढला. त्याचे फोटोहीव्हायरल झाले. हे कसले बाळासाहेबांचे स्मारक करणार? असल्या घाणेरड्या राजकारणाची किळस येते असेही राज ठाकरे म्हणाले.दीड महिन्यापासून होती कुणकुण!फोडाफोडीचे राजकारण करून सेनेने मराठी माणसाचा घात केला. जाणाºया सहा नगरसेवकांबद्दल दीड महिन्यापासून कुणकुण होती. मात्र ज्यांनी स्वत:ला बाजारात विकायला ठेवले आहे, ते मानसिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत, त्यांना ठेवून तरी काय करणार? महाराष्ट्रात राजकारण उमदे असावे. कुणी आयुष्यभर सत्तेत राहत नाही. एखादी गोष्ट करताना चुकीचा पायंडा पाडत नाही ना, याचे भान पक्षांनी ठेवायला हवे, अशी अपेक्षाही राज यांनी व्यक्त केली.
आता हातावर टाळी नाही, तर कानाखाली - राज, उद्धवचे नीच राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 5:37 AM