मुंबई : वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याबद्दल डॉक्टरांवर गुन्हा नोंदवण्यासाठी विशेष प्रशिक्षित पोलिसांच्या कक्षाची नियुक्ती करण्याची सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी केली.डॉक्टरांच्या संरक्षणासाठी सध्या अस्तित्वात असलेला कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यावर गुन्हा कसा नोंदवायचा याबाबत दिलेल्या निकालाची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना द्या, अशी सूचना मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी राज्य सरकारला केली.वैद्यकीय हलगर्जीपणाबाबत गुन्हा नोंदविण्याकरिता विशेष प्रशिक्षित पोलिसांचा कक्ष नेमू शकता. अशा स्वरूपाच्या तक्रारी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडे पाठवू नका. प्रशिक्षित पोलीस अधिकाऱ्याकडेच पाठवा. सध्याच्या काळात पोलिसांनी असे गुन्हे नोंदविताना थोडी सावधानता बाळगावी. संबंधित प्रकरणामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत घ्यावे. खरोखरच वैद्यकीय हलगर्जीपणाचे प्रकरण आहे की नाही, हे पडताळून पाहावे. गुन्हा नोंदवण्याची घाई करू नये. अन्यथा डॉक्टर मोकळ्या मनाने काम करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.विशेष प्रशिक्षित पोलिसांचा कक्ष नेमण्यासंदर्भात काय निर्णय घेण्यात आला आहे, याची माहिती राज्य सरकारला १६ जूनपर्यंत देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.
छळवणूक होता कामा नये!याचिकाकर्त्यांचे वकील राजेश इनामदार यांनी गुरुवारच्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले होते की, कोरोनाच्या कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना पोलीस नोटीस बजावत आहेत. कारण रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांच्याविरोधात तक्रार केल्या आहेत. काहींनी नातेवाईक गमावले आहेत. तर काही लोकांनी रुग्णांना मिळणाऱ्या उरपचारांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावर डॉक्टर्स चोवीस तास काम करत आहेत. त्यांची अशाप्रकारे छळवणूक होता कामा नये, याकडे लक्ष द्यावे, असे न्यायालयाने गुरुवारच्या सुनावणीत म्हटले होते.