- लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावीच्या पहिल्या यादीत झालेल्या गोंधळानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष दुसऱ्या यादीकडे लागले आहे. २० जुलैला सायंकाळी ५ वाजता अकरावीची दुसरी यादी जाहीर होणार आहे. अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत होत असलेल्या गोंधळामुळे दुसऱ्या यादी जाहीर होईपर्यंत विद्यार्थी आणि पालकांवर तणावात आहेत. १० जुलैला अकरावीची पहिली यादी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती. पण, संकेतस्थळावर माहिती अपलोड न झाल्याने रात्री १ वाजता यादी जाहीर करण्याची नामुष्की शिक्षण उपसंचालक कार्यालयावर ओढावली होती. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी म्हणून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. पण, हा प्रयोग यंदाही फसला आहे. विद्यार्थ्यांना दुसरा अर्ज भरताना अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे एक दिवस प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. हाच गोंधळ पुन्हा पहिल्या यादीवेळी दिसून आला. त्यामुळे आता दुसरी यादी तरी वेळेवर जाहीर होते की नाही, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. अकरावी प्रवेशासाठी तब्बल २ लाख ३६ हजार १४३ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केले होते. यापैकी पहिल्या यादीत १ लाख ५६ हजार ५०७ विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. त्यापैकी पहिल्या फेरीत तब्बल ७९ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. काही नामांकित महाविद्यालयांचा पहिल्या यादीचा कट आॅफ हा ९४ टक्के इतका आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कटआॅफमध्ये घट दिसून आली. पण, दुसऱ्या यादीत कटआॅफ कितीने घसरतो याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
आता प्रतीक्षा दुसऱ्या यादीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:17 AM