दर महिन्याला आढावा : आमदारांनी केली सुपरची पाहणी नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) समस्यांच्या निराकरणासाठी दर महिन्यात मेडिकलचा आढावा घेण्यात येईल, तसेच अधिष्ठात्यांची खर्चाची मर्यादा वाढवून ५० लाखांपर्यंत करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी लवकरच बैठक लावण्यात येईल, अशी माहिती आमदार अनिल सोले यांनी दिली.सलाईन, एक्स-रे फिल्म आणि स्पिरीटचा तुटवडा पडला आहे. याचा आढावा घेण्यासाठी आ. अनिल सोले व आ. सुधाकर कोहळे यांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांची भेट घेतली. बैठकीनंतर ते ‘लोकमत’शी बोलत होते.आ. सोले म्हणाले, ‘लोकमत’च्या वृत्तामुळे मेडिकलच्या समस्यांची माहिती झाली. त्याला घेऊनच हा आढावा घेण्यात आला. औषधे पुरवठादारांची बिले थकल्याने औषधांचा तुटवडा आहे. सध्या सलाईनसाठी अधिष्ठात्यांनी स्थानिक कोषातून दहा लाख रुपये दिले आहे. थकीत बिलांना मंजुरी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. रुग्णहितासाठी अधिष्ठात्यांची २० लाख रुपये खर्चाची मर्यादा वाढवून ती ५० लाखापर्यंत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री तावडे यांच्याशी लवकरच बैठक घेण्यात येईल. मेडिकलच्या समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याला आढावा बैठक घेतली जाईल, असेही आ. सोले म्हणाले. मेडिकलमधील आढावा बैठकीनंतर दोन्ही आमदारांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात होऊ घातलेल्या किडनी ट्रान्सप्लांट विभागाच्या प्रस्तावित वॉर्डाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. सुधीर गुप्ता आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मिस मॅनेजमेंटमुळे एक्स-रे फिल्मचा तुटवडा मिस मॅनेजमेंटमुळे (नियोजनाचा अभाव) एक्स-रे फिल्मचा तुटवडा पडला आहे. नियोजन असते तर फिल्म संपायच्या आधीच त्याचा खर्चाची मंजुरी घेतली असती. भविष्यात असे होऊ नये आणि रुग्णसेवा प्रभावित होऊ नये यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना देण्यात आल्याचे आ. सोले म्हणाले. डोळ्यात भरणारी स्वच्छताआ. सोले म्हणाले, कालपर्यंत अस्वच्छतेच्या नावाने मेडिकल ओळखले जात होते. परंतु अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या प्रयत्नामुळे मेडिकल स्वच्छ होऊ लागले आहे. काही भागात तर डोळ्यात भरणारी स्वच्छता आहे. रुग्णांच्या हितासाठी हे गरजेचे आहे. ट्रामाचा मार्ग मोकळाआ. सोले म्हणाले, ट्रामाचे बांधकाम पूर्णत्वाला आले आहे. परंतु विद्युत जोडणीसाठी लागणाऱ्या पाच कोटीच्या खर्चामुळे ट्रामा सेंटर अडचणीत येणार होते. ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात लक्ष घातले. मेडिकलला पाच कोटींची सवलत दिली. आता फक्त मेडिकलला ७२ लाख रुपये भरायचे आहे. यामुळे ट्रामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता मेडिकलवर वॉच
By admin | Published: January 16, 2015 1:02 AM