नवा गडी नवा राज: प्रशासन लागले कामालानागपूर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतून मोकळे होत नाही तोच प्रशासनाला नागपूरमध्ये होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वेध लागले आहे. त्यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे.नागपूरचे हिवाळी अधिवेशन राज्यात सत्तारूढ होणाऱ्या नवीन सरकारचे पहिले अधिवेशन असणार असल्याने मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री नवीन असतील. एकूणच नवा गडी नवा राज असे या अधिवेशनाचे स्वरूप राहील. अधिवेशनाची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. नवीन सरकारचे मंत्रिमंडळ याबाबत निर्णय घेईल. पण सरासरी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अधिवेशनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी बुधवारी यासंदर्भात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यात अधिवेशनाच्या व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. अधिवेशनासाठी मुंबई-ठाणे-कोकण वगळता इतर भागातून वाहने मागविली जातात. त्याच्या इंधनावर लाखो रुपये खर्च होतो. यंदा यासंदर्भात व्यवस्थित नियोजन केले जाणार आहे. मागेल त्याला वाहने अशी स्थिती यंदा राहण्याची शक्यता कमी आहे. आमदार निवासाची डागडुजी, रविभवनाची रंगरंगोटी,दुरुस्ती, वीज आणि पाणीपुरवठा, टेलिफोन व्यवस्था, स्वच्छता याबाबत अनुपकुमार यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व सर्व व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश दिले. अधिवेशन काळात शहरातील वाहतूक व्यवस्था कशी राहणार याबाबत तसेच सुरक्षा व्यवस्थेवरही चर्चा झाली.बैठकीला विभागीय उपायुक्त (सामान्य प्रशासन) आप्पासाहेब धुळाज, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, अतिरिक्त आयुक्त एम.एच.ए. खान, उपजिल्हाधिकारी पी.जी. पाटील, निशिकांत सुके, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी सर्जेराव शेळके, ए.आर. पाजणकर, विनोद बोथरिया, महापालिकेचे अधिकारी महेश धामेचा, रवींद्र घटमाळे, डॉ. रवींद्र इंगोले, पोलीस निरीक्षक एम. सय्यद, विजय पवार,जी.जे. नागलवार, डी.एस. भिसीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आता वेध हिवाळी अधिवेशनाचे
By admin | Published: October 23, 2014 12:33 AM