ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 26 - शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकावेल, माझ्या मनातलं लोकांनी ओळखलंय. शिवसेनेची 50 पैकी 25 वर्षं युतीमध्ये सडली. आता जे काही असेल ते स्वबळावर, आजपासून युतीसाठी कोणाच्याही दारात जाणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. ते गोरेगावच्या एनएसई ग्राऊंडवर शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मित्र पक्ष असलेल्या भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. ठाणे, नाशिक, मुंबई महापालिकेसह आता कोणत्याही जिल्हा परिषद निवडणुकीत युती होणार नाही, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युती तोडली आहे.
सत्तेमध्ये नालायक लोक बसलेली आहेत, सरकारी कार्यालयांमधले देव-देवतांचे फोटो काढण्याचा फतवा सहन करणार नाही. सरकारी कर्मचा-यांना पहिली घरे द्या आणि मग वटहुकूम काढा, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. ते म्हणाले, कोण कोणाच्या बाजूने आहेत तेच कळत नाही, काल एक पद्म पुरस्कार गुरुदक्षिणा म्हणून दिला. निधर्मीपणा सर्व बाबतीत आणा. खादीबाबतच्या कॅलेंडरवरून गांधींना का हटवलं ?, हिंमत असेल तर समान नागरी कायदा लागू करा, उधळलेल्या बैलांना वेसण घालण्याची वेळ आली आहे. सरकारच्या बैलांना रोखण्यासाठी शिवसैनिक रस्त्यांवर उतरले पाहिजेत. देव-देवतांचे फोटो काढण्याच्या आदेशापूर्वी सेनेला का विचारलं नाही. आम्हाला देव-देवतांचे फोटो काढण्याच्या अध्यादेशाबाबत अंधारात ठेवता, मग मलाही मंत्रिमंडळातील कारभारात पारदर्शकता हवी आहे. स्थायी समितीत भाजप मूग गिळून गप्प का ?, माझा सैनिक मर्द आहे, आजपासून युतीसाठी कोणाच्या दारात जाणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे
-माझ्या मनातील लोकांनी ओळखलं आहे
-लोकांच्या मनातलं मी ओळखलंय
-तुमच्या मनात आहे, तेच माझ्या मनात आहे
-शिवसैनिकांकडे बघितल्यानंतर मला काही बोलायची गरज नाही
-भाजपा कसल्या पारदर्शकतेच्या गप्पा मारतेय ?
-भाजपानं 114 जागांची मागणी करणं शिवसेनेचा अपमान
-आपल्यालादेखील उधळलेल्या बैलाला वेसण घालायचे आहे
-सत्तेची मस्ती दाखवून कारभार करणार असाल, तर आम्ही ती जिरवू
-स्थायी समितीत भाजपा मूग गिळून का बसले होते?
-आप्पासाहेबांना पद्म पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला
-ज्यांनी महात्मा गांधीजींना चरख्यावरून हटवलं, त्यांना उत्तर प्रदेशात हे राम म्हणण्याची वेळ
-सरकारी कार्यालयातील देव-देवतांचे फोटो काढण्याचा फतवा सहन करणार नाही
-फोटो हटविण्याचा अध्यादेश काढण्यापूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांना विचारले होते का ?
-पारदर्शी कारभारासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यालाही मंत्रिमंडळ बैठकीत बोलवा
-हिंमत असेल तर समान नागरी कायदा लागू करा
-राज्यात भाजपाचं सरकार की नालायकांचं ?
-शिवसेनेला कोणी कमी लेखत असेल तर त्याला शिल्लक ठेवणार नाही
-शिवसेनेची 50 पैकी 25 वर्षं युतीमध्ये सडली
-पाण्याखाली जाऊन रोगराई पसरली, त्यावेळी शिवसैनिकांनी मेडिकल कँप उभे केले होते
-आम्ही काम करून मत मागतो, काम न करता मते मागत नाही, मुंबई शिवसेनाच जिंकणार
-मुंबई, ठाणे, नाशिक पालिकांसह जिल्हा परिषदा स्वबळावर जिंकणारच
-‘पार्टी विथ डिफरन्स’मध्ये गुंडांना प्रवेश दिला जात आहे, अशा गुंडांना शिवसैनिक घाबरणार नाही
-काम करून मतं मागतो, थापा मारून नाही
-पुरोहितांवर धाडी टाकता, इतर धर्मीयांना का सोडता ?
-माझ्या घरात घुसून मला मारणार असाल, तर मी काय पंचारती ओवाळू
-देशाचे पंतप्रधानपद तुमच्याकडे, राज्याचे मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे, चांगली खाती तुमच्याकडेच
-युती तोडायला भाजपानं भाग पडलं
-यापुढे शिवसेना महाराष्ट्रात एकट्याने भगवा फडकावणार
-शिवसैनिकांची वज्रमूठ द्या, नडणा-यांचे दात पाडतो