लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिव्यांगांना मंत्रालयात येणे आणि जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था सरकारकडून करण्यात आलेली नाही याकडे लोकमतने ३० एप्रिलच्या अंकात लक्ष वेधल्यानंतर या वृत्ताची दखल घेत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी मंत्रालयाच्या दोन गेटवर दोन व्हीलचेअर्स आणि अटेंडंट यांची कायमस्वरुपी व्यवस्था आजपासून केली. महाराष्ट्र शासनाने आपल्या कार्यालयांमध्ये दिव्यांगांसाठी केलेल्या विशेष व्यवस्थेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने अलिकडे कौतुक केले होते. तथापि, राज्याच्या मंत्रालयातच दिव्यांगांची कशी हेळसांड होते याचे सचित्र वृत्त त्यानंतर लोकमतने प्रसिद्ध केले. सात मजली मंत्रालयात दिव्यांगांना सन्मानाने येताजाता यावे म्हणून काय करता येईल याची विचारणा बडोले यांनी लोकमतच्या वृत्तानंतर सदर प्रतिनिधीकडे केली आणि त्यानंतर लगेच व्हीलचेअर्स खरेदी करायला सांगितले. आज या सेवेचे उद्घाटन मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात बडोले यांच्या हस्ते झाले. संबंधित यंत्रणेशी चर्चा करून दोन मदतनीसदेखील नेमले. ते दिव्यांगांना व्हीलचेअरवर घेऊन जातील आणि पुन्हा गेटवर सोडतील.
आता मंत्रालयात दिव्यांगांसाठी व्हीलचेअर्स
By admin | Published: May 12, 2017 3:31 AM