- स्नेहा मोरे । लोकमत न्यूज नेटवर्क
माझे कुणीही ऐकत नाही, अपेक्षांचे ओझे आता पेलवत नाही... मला माझ्याप्रमाणे जगता येत नाही, असे रमेश (नाव बदललेले आहे) सांगत होता. नैराश्याने त्रस्त असणाऱ्या रमेशने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण तत्पूर्वी त्याला इंटरनेटवर एक हेल्पलाइन नंबर मिळाला. त्याने एकदा कॉल तरी करून पाहूया, म्हणून नंबर फिरविला. पलीकडील व्यक्तीने रात्रभर त्याचे म्हणणे ऐकून घेतले... नंतर धीरगंभीर आवाजात रमेशला काही तरी सांगितले... अन् काही वेळातच रमेश आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाला.वास्तव फाउंडेशनचे समुपदेशक मिलिंद कदम यांनी हा अनुभव सांगितला. या फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास ७० हजारांहून अधिक पुरुषांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात आले आहे. या हेल्पलाइनविषयी सांगताना कदम यांनी सांगितले की, राष्ट्रीय पातळीवर सुरू असणाऱ्या या हेल्पलाइनवर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या ठिकाणांहून कॉल्स येतात. बऱ्याचदा या हेल्पलाइनवर येणाऱ्या कॉल्सवर पीडितांच्या समस्या पैशांविषयी असतात. या वेळी कॉल्सच्या माध्यमातून समुपदेशन करून पीडितांना सकारात्मक विचारांकडे वळविण्याचा प्रयत्न असतो. ाा हेल्पलाइनसाठी ९० प्रशिक्षित विशेष स्वयंसेवक कार्यरत आहेत. दरदिवशी साधारणत: ८३ कॉल्स येतात, असे कदम यांनी सांगितले. याशिवाय, महत्त्वाचे म्हणजे, तापकीर यांच्या आत्महत्येनंतर पाच दिवसांत ५०० कॉल्स आले.घर चालवणे ही जबाबदारी फक्त पुरुषांचीच आहे. पत्नी-मुलांचे संगोपन त्यांनी करायलाच हवे, असे प्रचलित कायद्यातून दिसते. सर्वार्थाने सगळ्या जबाबदाऱ्यांचे ओझे वाहताना पुरुष मानसिकदृष्ट्या खचतो. त्यातून आत्महत्येचाही मार्ग स्वीकारतो. ही गंभीर बाब आहे. पुरुष हक्कांसाठी लढणाऱ्या या फाउंडेशनमधून त्यावर आवाज उठवला आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून अनेकांना मदत मिळते आहे, अशी माहिती ‘वास्तव’च्या अमित देशपांडे यांनी दिली.दिल्ली, राजस्थान, हरयाणामधून सर्वाधिक कॉल्स- मागच्या दोन महिन्यांत हेल्पलाइनवर दिल्ली, राजस्थान, हरयाणा, जम्मू-काश्मीर येथून सर्वाधिक म्हणजे १५ हजार ४२ कॉल्स आले. त्यानंतर मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ येथून १४ हजार ८२३ कॉल्स, तर महाराष्ट्र, गुजरातमधून ८ हजार कॉल्स आले. - ही स्वयंसेवी संस्था अनेक वर्षांपासून पुरुषांच्या हक्कासाठी लढा देत आहे. हेल्पलाइन सेव्ह इंडियन फॅमिली या राष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत चालवण्यात येत आहे.माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक८४२४०२६४९८, ८४२४०२७४९८, ८४२४०२८४९८