पुणे : शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हानिहाय पाच दिवसांचा कृषी महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला २० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ३४ जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव घेण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान व सरकारी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच प्रगतशील शेतकऱ्यांशी इतर शेतकऱ्यांचा संवाद घडवून आणला जाणार आहे. शेतकऱ्यांचे गट संघटित करून शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील कृषी व पूरक उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी तसेच पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना या महोत्सवात सन्मानित करण्यात येणार आहे. कृषी पूरक उद्योगाशी निगडित सर्व घटकांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
...आता जिल्हानिहाय कृषी महोत्सव होणार!
By admin | Published: February 09, 2017 5:22 AM