बारामती : खेडोपाडी जाळे पसरलेल्या पोस्ट खात्याला अधिक लोकाभिमुख करण्यात येत आहे. त्याचअनुषंगाने आता नागरिकांना पोस्टामध्येच तूर, हरभरा, मूग, मसूर आदी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार आहेत. केंद्र शासनाच्या अन्नधान्य वितरण यंत्रणेमार्फत थेट स्वच्छ व दर्जेदार डाळी १ ते १० किलोच्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. स्वस्त धान्य दुकानात अन्नधान्याचा वितरण पुरवठ्यात काळाबाजार होतो. त्यामुळे थेट पोस्टातूनच डाळींचे वितरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्याची सुरुवात दिवाळीपूर्वी अथवा १ नोव्हेंबरपासून होईल, असे पोस्टाच्या सूत्रांनी सांगितले. या वितरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी न करता उपलब्ध मनुष्यबळावरच हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पोस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना अगोदर सुचित करण्यात आले आहे. तूर, हरभरा, मूग, मसूरसह सर्व प्रकारच्या डाळी थेट पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहेत. (प्रतिनिधी)>माती परीक्षणासाठी पोस्टाची मदत माती परीक्षणासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी पोस्ट कर्मचाऱ्यांनाच माती परीक्षणाचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रांमार्फत देण्यात आले आहे. पहिले पीक काढल्यानंतर दुसरे पीक घेण्यापूर्वी माती परीक्षण करावे, असे सांगितले. त्यानुसार बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना पोस्टाच्या सहकार्याने माती परीक्षण करण्याची सोय झाली आहे. पोस्ट कर्मचाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
आता डाळी मिळणार पोस्टातून!
By admin | Published: October 19, 2016 1:21 AM