महाराष्ट्रातील राजकारणाने अवघ्या देशातील राजकीय पक्षांना विचार करायला लावला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत ज्या प्रकारे बंड झाले आणि पक्ष, पक्षाचे चिन्ह काढून घेतले गेले. यावरून आपल्याही पक्षासोबत असे झाले तर अशा चिंतेत अनेक पक्ष आहेत. यातच आता मनसेनेकाँग्रेसचा पंजा काढून घेण्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच यावर तातडीने निर्णय झाला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पोलीस दलाच्या चिन्हामध्येही पंजा आहे आणि काँग्रेसचे चिन्हही पंजा आहे. निवडणूक काळात पोलीस बंदोबस्त मोठा असतो. यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी केला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने एकतर काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह बदलावे किंवा पोलीस दलाच्या चिन्हातील पंजातरी काढून टाकावा अशी मागणी केली आहे. निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे. एबीपी माझाने याचे वृत्त दिले आहे.
आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय देतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. असे झाले तर अनेक पक्षांच्या चिन्हावरही असेच आक्षेप येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढवत नाहीय. राज ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. परंतु याचवेळी त्यांनी विधानभेच्या तयारीला लागावे असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. भाजपासोबतच्या चर्चांवेळी शिंदेंनी धनुष्यबाणावर जागा लढविण्याची अट ठेवल्याने राज यांनी मला माझे चिन्ह आहे, असे सांगत नकार दिला होता. तसेच लोकसभेला शक्य नाही, विधानसभेला एकत्र लढण्याचे पाहू असे म्हटले होते.