पंकज राऊत/लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : देशातील अतिसंवेदनशील अशा तारापूर अणुऊर्जा केंद्रालगतच्या घिवली व कांबोडा या गावाच्या मध्यावर जर्मन नागरिक फिरतांना दिसताच जागृत नागरिकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. मात्र तो परदेशी नागरिक अणुऊर्जा केंद्र परिसरातील गावा पर्यंत बिनदीक्कतपणे पोहचला ही बाब केंद्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे. रुजुस अँटॉन ब्राईयुगेन हा जर्मनीचा नागरिक हरियाणात राहणाऱ्या आॅस्ट्रेलियन मैत्रिणीच्या लग्नासाठी आला होता परंतु त्याच्याजवळ पैसे तुटपुंजे असल्याने तो प्रथम अहमदाबादला येऊन नंतर दमणच्या समुद्र किनाऱ्या मार्गे मुंबईच्या दिशेने पायी चालत जात असतांना राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा अणुऊर्जा केंद्राच्या परीसरातील घिवली गावात मंगळवारी दिसताच जागृत नागरिकांनी पकडून त्याला तारापूर पोलिसांच्या हवाली केले.त्या अनोळखी नागरिकांची आय. बी. सी. आय. एस. एफ. आणि तारापूर पोलिसांनी संयुक्तपणे सुमारे पाच तास कसून चौकशी व तपासणी केली असता त्याच्या जवळ पासपोर्ट, ५ जून पर्यंतचा व्हीसा, एक मोबाईल जो पूर्णपणे डिसचार्ज होता, स्लिपिंग मॅट या व्यतिरिक्त कुठलीही वस्तू न आढळल्याने त्या नागरिकाला सोडण्यात आले असले तरी अणुऊर्जा केंद्रपासूनच्या काही अंतरावर असलेल्या गावापर्यंत परदेशी नागरिक पोहोचू कसा शकतो या बाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तो दमणपासून तारापूरपर्यंत किनार पट्टीवरु न कसा येऊ शकला. त्याला एवढ्या मोठ्या प्रवासात कुणीही का हटकले किंवा पकडले नाही. ही गंभीर व चिंतेची बाब असून संबंधित यंत्रणा गाफिल राहील्यानेच हा जर्मन नागरिक संवेदनशील भागापर्यंत पोहचू शकल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता आहे.
अणुऊर्जा केंद्रालगत जर्मनाला पकडले
By admin | Published: June 01, 2017 4:37 AM