कोरोना रुग्ण वाढत असल्याने कठोर निर्णय घ्यावे लागतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 05:52 AM2021-02-16T05:52:39+5:302021-02-16T05:53:04+5:30
Deputy Chief Minister Ajit Pawar : नागरिकांनी शिस्त पाळली नाही तर पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याबाबतची मानसिकता तयार ठेवावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
औरंगाबाद : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत २० हजार २११ कोरोना रुग्ण आढळणे ही चिंताजनक बाब आहे. नागरिकांनी शिस्त पाळली नाही तर पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याबाबतची मानसिकता तयार ठेवावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना याबाबत सांगितले असून हे सगळे काळजीचे वातावरण आहे. जगात विविध देशांत दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन करावे लागते आहे पण आपल्याला त्याचे गांभीर्य नाही. काही गोष्टींबाबत वेळेत निर्णय न घेतल्यास अडचणी वाढतील. काही लोक राजकारण करीत आहेत. शिवजयंती १९ फेब्रुवारीला असून जयंतीला बंधने कशाला आणता, अशी वक्तव्ये काही करीत आहेत. कोरोना वाढू नये यासाठी ही खबरदारी घेत आहोत. मागील वर्षभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम रद्द केले. त्यामुळे राजकारण करून भावनिक आधार घेण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असे आवाहन पवार यांनी केले.
धोक्याचा इशारा, हलगर्जी करू नका
विभागीय आयुक्तालया बैठकीनंतर उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील रुग्णवाढ गंभीर असून जानेवारी आणि फेब्रुवारीत संख्या वाढली आहे. नाशिकला १४ फेब्रुवारीपर्यंत १४६३, औरंगाबादला ४२७, अमरावतीत २४२०, नागपूरला २६२८, वर्धा येथे ४६६ अशी रुग्णसंख्या वाढणे हा धोक्याचा इशारा आहे. याचा गंभीरतेने विचार करायला हवा. हलगर्जीपणा कुणीही करू नये.
कार्यक्रमांबाबत लवकरच निर्णय घेणार
राजकीय कार्यक्रमांनाच जास्त गर्दी होत आहे, याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, हा मुद्दा बरोबर आहे. याला कुठेतरी ब्रेक लागावा यासाठी सर्व पक्षप्रमुखांना बसून सांगावे लागेल. राजकीय पक्षांना नियमावली नाही आणि इतर जयंती, पुण्यतिथींवर बंधने आणली, तर लोकांना मान्य होणार नाही. यासाठी मुंबईत राज्यप्रमुखांशी बोलून सरकार निर्णय घेईल.
आणखी १८-१९ लसी लवकरच - डॉ. हर्षवर्धन
कोरोनाविरोधी आणखी १८ ते १९ लसी जवळपास तयार असून, त्यांच्या चाचण्या सुरू आहेत, अशी माहिती देतानाच, भारतातून २० ते २५ देशांना लसींची निर्यात करण्यात येणार असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिली. देशातील ५० वर्षे वयावरील लोकांना दोन ते तीन आठवड्यांत लस देणे सुरू होईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
नियम पाळले नाहीतर पुन्हा लॉकडाऊन - टोपे
विदर्भ, मुंबईत रुग्ण वाढत आहेत. जे अधिकारी ट्रॅकिंग, टेस्टिंगमध्ये लक्ष देत नाहीय, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. सध्या नियम पाळले जात नाहीये हे स्पष्ट दिसतेय. जनतेला त्रास होऊ नये म्हणून आपण निर्बंध उठवले. पाश्चिमात्य देशात पुन्हा लॉकडाऊन सुरू झालाय. नियम पाळले गेले नाही तर आपल्याकडेही लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
विषाणू काच, प्लास्टिकवर अधिक काळ जिवंत
कोरोनाचा विषाणू हा कागद, कपड्यांपेक्षा काच, प्लॅस्टिक यांच्या पृष्ठभागावर अधिक काळ जिवंत राहातो, असे आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी केलेल्या पाहणीतून आढळून आले आहे. आयआयटी मुंबईतील संशोधक संघमित्र चॅटर्जी यांनी सांगितले की, रुग्णालये, कार्यालये येथे काच, स्टेनलेस स्टील, लॅमिनेटेड लाकूड यांनी बनविलेल्या फर्निचरवर सच्छिद्र पृष्ठभागाच्या गोष्टींचे आवरण घालावे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाला आणखी प्रतिबंध करता येईल.