मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दोन दिवसांत रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे, तर मुंबईतील संसर्गाचा दर चार टक्के इतका असून मुंबईच्या दृष्टीने ही बाब खूपच चिंतेची असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टोपे म्हणाले की, रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास येत्या एक ते दोन दिवसांत मुंबईसह राज्यातील निर्बंध कठोर केले जाऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य खाते आणि टास्क फोर्स यांची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्बंध आणखी कठोर करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा इशारा टोपे यांनी दिला.
आठवड्याभरापूर्वी म्हणजेच २० नोव्हेंबरला राज्यात कोरोनाचे ६ हजार सक्रिय रुग्ण होते. २८ तारखेला ही संख्या ११ हजार ४९२ वर पोहोचली. सायंकाळी ही संख्या २० हजारांपर्यंत जाऊ शकते, असा इशारा टोपे यांनी यावेळी दिला. मुंबईत आठवडाभरापूर्वी ३०० रुग्ण आढळले होते. दोन दिवसांत संख्या दुप्पट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ४००-५०० वरून बुधवारी दोन हजारांच्या पुढे असू शकेल, अशी स्थिती आहे. ही नक्कीच चिंताजनक बाब असल्याचे ते म्हणाले.
ऑक्सिजनची मागणी वाढलेली नाही७०० मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजनचा खप गेला की, लॉकडाऊन लावण्याचे निकष आपण आधीच नक्की केले आहे. सध्या ऑक्सिजनची मागणी वाढल्याचे चित्र नाही. मात्र, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, ही चिंतेची बाब असल्याचे टोपे म्हणाले.लाट असली तरी राज्याचा आरोग्य विभाग आणि यंत्रणा तयारीत आहोत. घाबरण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घ्यावी लागेल.