नाशिक: येथील धुळे येथून राज्य परिवहन महामंडळाच्या कळवण आगाराची बस विनाथांबा (एम.एच०६ एस ८४२८) कळवणच्या दिशेने जात असताना देवळा पोलीस ठाणे हद्दीत मिशी फाट्यावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस समोरून येणाऱ्या काळ्यापिवळ्या अॅपे प्रवाशी रिक्षावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की बससह रिक्षा रस्त्यालगत असलेल्या विहिरीचे संरक्षक कठडे तोडून विहिरीत कोसळली. बसमध्ये चालक, वाहकासह ४८ प्रवाशी होते. रिक्षामध्ये चालकासह ११ प्रवाशी होते.या अपघातातमृत्यूमुखी पडलेल्या २१ प्रवाशांचे मृतदेह रात्री साडेनऊ वाजेपर्यंत बचावपथकाच्या हाती लागले होते, असे पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एकूण १८ प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर देवळा ग्रामिण, मालेगाव उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बस धुळ्याकडून कळवणकडे जात होती व अॅपरिक्षा मालेगावकडे जात होती. यावेळी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन हा अपघात मंगळवारी (दि.२८) दुपारी तीन वाजेच्या सुमारास देवळा-मालेगाव रस्त्यावर घडला. घटनेची प्रथम माहिती १०० या आपत्कालीन क्रमांकावरून नाशिक शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर नियंत्रण कक्षाने तत्काळ ग्रामिण नियंत्रण कक्षाशी मोबाइलद्वारे संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ ग्रामिण पोलीस दलाने मदतीची सुत्रे हलविली. राज्य आपत्काली वैद्यकिय मदत देणाºया १०८सेवेच्या एकूण ८ रूग्णवाहिकांसह काही खासगी रूग्णवाहिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. तसेच ग्रामिण पोलिसांच्या जलद प्रतिसाद पथकासह देवळा पोलीस, सटाणा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळेतच सटाणा, मालेगाव अग्निशमन दलाचे १५ जवान अत्यावश्यक साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल झाले. रात्री नऊ वाजेच्या सुमारास एनडीआरएफच्या पथकालाही जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी घटनास्थळी पाचारण करण्याचे आदेश दिले. घटनेची माहिती मिळताच सिंह, अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यादेखील घटनास्थळी पोहचल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत दोन मृतदेह शोधण्याचे काम विहिरीत सुरू होते. सायंकाळपर्यंत क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस व अॅपरिक्षा बाहेर काढण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य घटनास्थळी सुरू होते.
नाशिकजवळ झालेल्या या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दहा लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य परिवहन महामंडळाकडून केला जाणार असल्याची माहिती परिवहन संसदीय कार्य तथा अध्यक्ष राज्य परिवहन महामंडळ अॅड.अनिल परब यांनी दिली.