नाशिक : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या सिडकोतील भुजबळ फार्मच्या क्षेत्रफळाची मोजणी तसेच मालमत्तेचे सोमवारी मूल्यांकन करण्यात आले. सकाळी ११ वाजेपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील मुंबईच्या अधिकाऱ्यांनी फार्म ताब्यात घेत मूल्यांकनास सुरुवात केली होती.बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल तीन गुन्ह्यांप्रकरणी भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक झाली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक भुजबळ फार्मवर दाखल झाले. तपास अधिकाऱ्यांनी फार्म परिसर व आलिशान बंगल्याची मोजदाद केली. अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत माध्यमांना कुठलीही माहिती दिली नाही. तब्बल दोन ते अडीच तास भुजबळ यांच्या मालमत्तेची मोजदाद सुरू होती. फार्मचे प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले होते. भुजबळ यांचे नवीन व जुन्या निवासस्थानाच्या एकूण क्षेत्राची मोजणी केली. (प्रतिनिधी) >८७० कोटींच्या घोटाळ्याचा आरोपदिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम कंत्राटात अफरातफर केल्याचा आरोप छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याशिवाय मुंबई विद्यापीठातील भूखंड घोटाळा, अंधेरी आरटीओ, मुंबई-नाशिक टोलरोड आदी नऊ प्रकल्पांमध्ये नातेवाइकांना कंत्राट देऊन सुमारे ८७० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भुजबळांवर आहे.>छगन भुजबळ यांच्यावर दाखल गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून एसीबी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भुजबळ फार्म व परिसराची मोजदाद केली. उपरोक्त कारवाईमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश नव्हता. तपासासाठी अधिकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. बंगला जप्त केल्याची अफवा आहे. - अॅड. जालिंदर ताडगे, भुजबळ यांचे वकील
भुजबळ फार्मची एसीबीकडून मोजदाद
By admin | Published: August 23, 2016 5:34 AM