श्रीनारायण तिवारी - मुंबईवाघांच्या संख्येत देशात तब्बल ३० टक्के वाढ झाल्याचे वृत्त असले तरी महाराष्ट्र मात्र यात खूप मागे पडला आहे. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत केवळ १२.६ टक्केच वाढ नोंदवली गेली आहे. वाघांच्या संख्येत मंदगतीने होत असलेल्या वाढीला राज्याचा वन विभाग ‘सकारात्मक कल’ समजत असला तरी प्राणीप्रेमींमध्ये मात्र याबद्दल काळजी व्यक्त होत आहे.वन विभागाच्या माहितीनुसार २०१४ मध्ये झालेली व्याघ्रगणना फक्त मेळघाट, पेंच, ताडोबा आणि सह्याद्री व्याघ्रप्रकल्पांतच झाली आहे. यात नव्याने घोषित झालेल्या नवेगाव आणि बोर व्याघ्र प्रकल्पांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. नवेगाव व बोर प्रकल्पातही काही वाघ सापडू शकतात त्यामुळे एकूण वाघांची संख्या वाढेल, असे वन विभागाचे म्हणणे आहे. सन २००६मधील गणनेनुसार राज्यात १०३ वाघ आढळले होते. त्यानंतर २०१० मध्ये फेरगणना केली असता ती संख्या १६९ वर गेली. २०१४ च्या गणनेनुसार १९०वर वाघ आहेत. गेल्या चार वर्षांत वाघांच्या संख्येत १२.६ टक्के वाढ झाली, असे म्हणता येईल. एकुणच आकडेवारी असे सांगते की, झालेली वाढ ही मंदगतीची आहे.देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत कमी वाढ झाली असली तरी राज्याचे मुख्य वनसंरक्षक विनय सिन्हा यांनी ही संख्या समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. भौगोलिक स्थिती लक्षात घेता १२.६ टक्के वाढसुद्धा समाधानकारकच म्हटली पाहिजे, असे ते सांगतात.
राज्यात वाघांच्या संख्येत केवळ १२.६ टक्के वाढ
By admin | Published: January 22, 2015 1:40 AM