पुणे : दरवर्षी वाहनसंख्येत ५ टक्के वाढ होत असल्याचे गृहीत धरले असतानाही, पुणे-कोल्हापूर महामार्गावरील किणी आणि तासवडे टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा घट झाली आहे! रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) स्वतंत्र एजन्सीमार्फत जे सर्वेक्षण केले, त्या आकडेवारीपेक्षाही निम्मीच वाहने रस्त्यारून धावत असल्याचे टोल आकारणी करणाऱ्या कंपनीच्या आकडेवारीवरून ही घट प्रकर्षाने जाणवते.एमएसआरडीसीने एजेएस स्केल इंटरनॅशनल या एजन्सीकडून जानेवारी आणि फेबु्रवारी २०१४ मध्ये सातारा-कोल्हापूर महामार्गावरील किणी आणि तासवडे या टोल नाक्यांवरून दररोज किती वाहने धावतात, याचा सर्वे करून घेतला होता़ त्यानुसार किणी टोल नाक्यावरून जानेवारी २०१४ मध्ये १९ हजार २७ तर, तासवडे टोलनाक्यावरून २२ हजार ३८ वाहने दररोज धावत असल्याचे दिसले. मात्र, टोलवसुली करणाऱ्या कन्सल्टिंग इंजिनियर्स ग्रुपने दिलेल्या आकडेवारीत, जानेवारीत किणी टोल नाक्यावरून १३ हजार ७९० वाहने, तर तासवडे टोल नाक्यावरून १४ हजार ८६६ वाहने धावल्याची नोंद आहे!टोलवसुलीचा करार करताना दरवर्षी ५ टक्के वाहनसंख्या वाढणार, असे गृहीत धरले आहे. मात्र, २०१४ मध्ये जितकी वाहने या रस्त्यावरून गेली, त्यात २०१५ मध्ये घट झाल्याचेही दाखविण्यात आले आहे. वाहने घटली कशी? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)१२ वर्षांत वाहनसंख्येत वाढच नाहीरस्ते विकास महामंडळाच्या सर्वेक्षणानुसार, आॅक्टोबर २००३ मध्ये किणी टोल नाक्यावरून १० हजार ८६४ आणि तासवडे टोल नाक्यावरून ९ हजार ८८६ वाहने जात होती. मात्र, बारा वर्षांनंतरही, तसेच प्रमाण आज कंपनी दाखवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले, ‘एखाद्या महामार्गावरील वाहने १० वर्षांत कमी झाल्याचे जगात उदाहरण नाही़ टोल कंपन्यांनी दिलेली आकडेवारी आणि आपण करवून घेतलेल्या सर्वेची आकडेवारी तपासून पाहण्याची कोणतीही तसदी रस्ते विकास महामंडळ अथवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घेत नाही.