डोंबिवली (ठाणे) : येथील रासायनिक कंपनीत गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटातील बळींची संख्या ११ झाली असून, एकूण १८३ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. कंपनीचे मालक वाकटकर यांचे दोन्ही पुत्र सुमीत, नंदन आणि सून स्नेहल यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये शुक्रवारी ४५ जण उपचार घेत होते. त्यापैकी १४ जण गंभीर आहेत. प्रोबेस कंपनीचे मालक सुमीत यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीत एकूण नऊ कामगार होते. सुशांत कांबळे हा कामगार अजूनही बेपत्ता आहे. दुर्घटनाग्रस्त ठिकाणी ढिगारा उपसताना रसायनांची गळती होऊन त्रास होऊ नये, यासाठी ५०० मीटर परिसरातील लोकांना घरे सोडून तात्पुरते स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले होते. रसायनांनी भरलेली काही सीलबंद पिंपे हस्तगत करण्यात आली. ढिगारे उपसणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही उग्र रसायनांमुळे मळमळणे, भोवळ येणे असा त्रास होत होता. शुक्रवारी आणखी एक मृतदेह ढिगाऱ्यातून काढण्यात आला. तो नंदन यांचा असल्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)स्फोटामुळे २४ कंपन्यांचे नुकसानस्फोटामुळे आजूबाजूच्या एकूण २४ कंपन्यांचे नुकसान झाले असून, काही कंपन्यांचे मालक व कामगार उपचार घेत आहेत. या परिसरातील १५७३ घरांचे तर २४ कंपन्यांचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी प्रशांत उकीर्डे यांनी दिली. वाकटकर यांची सून स्नेहल हिचा मृतदेह बाजूच्या कंपनीतील पहिल्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी आढळला. गुरुवारी रात्री अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून काढलेल्या मृतदेहाची सकाळी ओळख पटली व तो सुमीत यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
डोंबिवली स्फोटातील बळींची संख्या ११
By admin | Published: May 28, 2016 4:43 AM