“अल्पमतात असलेला व्हिप आणि गटनेता यांना निलंबन करता येत नाही. आम्ही दोन तृतीयांश बहुमताचं पत्र सचिव आणि उपाध्यक्षांना दिलं आहे. अशाप्रकारे कोणत्याही प्रकारचं निलंबन करणं बेकायदेशीर होईल. लोकशाहीत संख्या आणि बहुमताला महत्त्व असतं. अल्पमत असताना गटनेता बदलण्याचं केलेलं कामही बेकायदेशीर आहे. सर्व सदस्यांना बोलावून, बैठक घेऊन गटनेता बदलता येऊ शकतो. परंतु अल्पमत असतानाही गटनेता बदलण्याचं काम केलंय. त्यामुळे अशाप्रकारचं निलंबन करता येणार नाही आणि केल्यास ते बेकायदेशीर असेल,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेनेनं त्यांच्यावर सुरू केलेल्या कारवाईवर उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
“आम्ही स्थापन केलेल्या गटाचं पत्र झिरवळ यांना दिला आहे. त्यांनी नियमानुसार त्यावर कार्यवाही करावी अशी आमची इच्छा आहे,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले. साम मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. आमच्याकडे बहुमत आहे, अॅफिडेविट केलंय, खोट्या आकडेवारीवर कारवाई होत असेल, तर न्यायालयीन लढाई लढावी लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. आमची एक बैठक होईल. त्यात विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल आणि पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेकडून आमदारांच्या निलंबनाची मागणीशिवसेनेच्या बंडखोर १२ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने गुरुवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. शिवसेनेने बोलाविलेल्या बैठकीला हे सदस्य उपस्थित नसल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर आज आणखी चार आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
कोण आहेत आमदार... १) एकनाथ शिंदे, २) अब्दुल सत्तार, ३) संदीपान भुमरे, ४) प्रकाश सुर्वे, ५) तानाजी सावंत, ६) महेश शिंदे, ७) अनिल बाबर, ८) यामिनी जाधव, ९) संजय शिरसाट, १०) भरत गोगावले, ११) बालाजी किणीकर, १२) लता सोनावणे, १३) सदा सरवणकर, १४) प्रकाश आबिटकर, १५) संजय रायमूलकर, १६) रमेश बोरनारे.