मुंबई : नर्सिंग प्रवेशासाठी अनिवार्य केलेल्या सीईटीमुळे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये कमालीची घट झाली. यंदा निम्म्याहून अधिक जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आल्याने नर्सिंगची सीईटी रद्द करावी, अशी मागणी नर्सिंग महाविद्यालय प्रशासनाकडून वैद्यकीय व शिक्षण संचालनालयाकडे करण्यात आली आहे. ही मागणी विचाराधीन असून पुढील शैक्षणिक वर्षापासून यावर अंमलबजावणी होण्याची शक्यता असल्याचे नर्सिंग महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.बायोलॉजी विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नर्सिंगसाठी पात्र असतात. परंतु सर्वोच्च न्यायालयाने नर्सिंगचा समावेश ‘प्रोफेशनल’ अभ्यासक्रमात करून नर्सिंग अभ्यासक्रम प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य केली. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाल्याची तक्रार नर्सिंग महाविद्यालय वैद्यकीय व शिक्षण संचालनालयाकडे करीत आहेत. राज्यात नर्सिंगची ४० हून अधिक महाविद्यालये असून नर्सिंगच्या सुमारे तीन हजार जागा आहेत. परंतु सीईटी बंधनकारक केल्याने निम्म्याहून अधिक जागा रिक्त असल्याची तक्रार करत महाविद्यालयाचा कारभार चालवायचा कसा, असा प्रश्न नर्सिंग महाविद्यालयांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे सीईटी रद्द करण्याची महाविद्यालयांची मागणी जोर धरत आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय तसेच प्रवेश नियंत्रण अधिकारी यांच्यात नुकतीच बैठक झाली. यात सीईटी रद्द करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे समजते. या संदर्भातील अधिसूचना लवकरच निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची सीईटीच्या कचाट्यातून सुटका होऊ शकते. (प्रतिनिधी)
पुढील वर्षापासून नर्सिंग सीईटी रद्द?
By admin | Published: November 19, 2016 2:21 AM