गडचिरोली : अल्पमुदतीचे तांत्रिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्थांनी सुमारे २५ कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा केल्याचे उघडकीस आल्यानंतर आता नर्सिंग संस्थांनीही बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्तीच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटल्याचे उघडकीस आले आहे. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल व भारतीय परिचर्या परिषद, नवी दिल्लीची एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमाला मान्यता नसतानाही शिष्यवृत्तीचे वाटप झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात सन २०१०-११पासून एएनएम व जीएनएम अभ्यासक्रम देणाऱ्या संस्थांची संख्या झपाट्याने वाढली आहे. उदा. सन २०१०-११ या वर्षात एएनएम /जीएनएम अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांची संख्या अनुक्रमे १९३ व १०१ मिळून २९४ होती तर सन २०१४-१५मध्ये ५०६ व २१७ अशी एकूण ७२३ होती. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलतर्फे सदर अभ्यासक्रमांना परवानगी दिल्यानंतर इंडियन नर्सिंग कौन्सिल नवी दिल्लीतर्फे वार्षिक परवानगी दिली जाते. महाविद्यालयांची नियमित तपासणी झाल्यानंतर खासगी संस्थांतर्फे नर्सिंग अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. २०११-१२ या वर्षाकरिता अनेक महाविद्यालयांच्या एएनएम या नर्सिंग अभ्यासक्रमाला भारतीय परिचर्या परिषद नवी दिल्लीची परवानगी मिळाली नव्हती. मात्र अनेक संस्थांनी २०१२-१३ या वर्षांत शेकडो विद्यार्थ्यांची नोंदणी करून समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाकडून कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्तीची उचल केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या अभ्यासक्रमाचा प्रतिवर्ष ६५ हजार रुपये दर ठरविला आहे. या दरानुसारच अनेक नर्सिंग संस्थांनी बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती हडप केली आहे. चंद्रपूर येथील नर्सिंग स्कूल चालविणाऱ्या एका खासगी संस्थेने २०१२-१३ या वर्षांत समाज कल्याण विभागाकडे ११४ व आदिवासी विकास विभागाकडे १० अशा एकूण १२४ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीकरिता नोंदणी केली होती. (स्थानिक प्रतिनिधी)
मान्यता नसताना नर्सिंग संस्थांनी लाटली शिष्यवृत्ती
By admin | Published: April 28, 2015 1:31 AM