मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराबरोबरच दूध भुकटीचे वाटप करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी घेतला.इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दूध भुकटी दिली जाईल. एका विद्यार्थ्यास एका महिन्यासाठी २०० ग्रॅम भुकटीचे एक पाकिट असे तीन महिन्यांसाठी ६०० ग्रॅमची तीन पाकिटे दिली जातील.पालकांनी त्यांच्या पाल्यांना दूध भुकटीपासून घरी दूध तयार करून देणे अपेक्षित आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने चालविली जाईल. दूध भुकटी ही महाराष्ट्रात तयार झालेली असेल.योजनेच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. दूध भुकटीचे वाटप एकाच दिवशी करण्यासाठी संबंधित शाळेने दूध भुकटी वाटप दिवस जाहीर करून शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत भुकटीचे वाटप करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.राज्यात दूधदरवाढीसाठी आंदोलन सुरू असताना शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारासोबत दूध भुकटीचे वाटप करावे, जेणेकरून दूधसंघांकडील भुकटीची विक्री होऊन दूधउत्पादकांना चार पैसे मिळतील, अशी मागणी पुढे आली होती.
पोषण आहारात आता दूध भुकटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 2:23 AM