मुंबई: गेल्यावर्षी दक्षिण कोरियातून मुंबईत आणलेल्या पेंग्विनची वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानात (राणीची बाग) निगा राखण्यात येत असून त्यांच्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण निर्माण करण्यात आले आहे, अशी माहिती सोमवारी मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली.आत्तापर्यंत पेंग्विनना वेगळे ठेवण्यात आले असल्याची माहिती मुंबई महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली. गेल्यावर्षी मुंबईत आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एक पेंग्विन तीन महिन्यांत मृत झाल्याने उरलेल्या सात पेंग्विनना पुन्हा दक्षिण कोरियात पाठवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका वकील अद्वैत सेठना व अन्य काही वकिलांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत पेंग्विनचे सार्वजनिक प्रदर्शन करू नये, असा अंतरिम आदेश महापालिकेला देण्यात यावा, अशी मागणी सेठना यांनी खंडपीठाकडे केली. पेंग्विनना सध्या क्वारंन्टीनमध्ये ठेवले आहे, तिथे केवळ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाच प्रवेश आहे. (प्रतिनिधी)
प्राणीसंग्रहालयात पेंग्विनसाठी पोषक वातावरण
By admin | Published: January 17, 2017 5:56 AM