जालना - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या भूमिकेतून मागील ७ दिवसांपासून लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनामुळे हाकेंची प्रकृती सातत्याने ढासळत आहे. त्यांच्या तब्येतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जात आहे. मात्र उपचार घेण्यास लक्ष्मण हाकेंनी नकार दिला आहे. जर त्यांनी उपचार घेतले नाही तर परिस्थितीत आणखी गंभीर होऊ शकते असा धोका डॉक्टरांनी वर्तवला आहे.
डॉ. दीपक सोनावणे म्हणाले की, उपोषणामुळे लक्ष्मण हाकेंना थकवा आला असून त्यांचे ब्लडप्रेशर वाढलेले आहे. हे आरोग्यासाठी चांगले नाही. उपोषण सोडण्याची आम्ही विनंती केली, परंतु ते ऐकत नाहीत. उपचार घेण्यासही नकार दिला आहे. लक्ष्मण हाकेंचं वजनही घटलं आहे. शुगर, पल्स नॉर्मल आहेत. ब्लड प्रेशर वाढला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच ब्लड प्रेशर वाढल्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यांच्या मेंदूवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. हायपरटेंशनमुळे हार्टअटॅक आणि पॅरालिसिससारखे धोके होऊ शकतात. डॉक्टर म्हणून आम्ही त्यांना उपचारासाठी विनंती केली परंतु त्यांनी नकार दिला आहे असंही डॉ. दीपक सोनावणे यांनी म्हटलं.
दरम्यान, उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांच्या कुटुंबाने सरकारला विनंती करत ओबीसीसाठी लढा देणाऱ्या उपोषणकर्त्यांची दखल घ्यावी. ओबीसी आरक्षणावर कुठलाही अन्याय होता कामा नये. समाजासाठी स्वत:चा जीव द्यायला ते तयार आहेत. मनोज जरांगे यांनी दोन जातींमध्ये वाद निर्माण केलाय ते बंद करावे अशी माझी हात जोडून विनंती आहे असं नवनाथ वाघमारे यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे.
समाजानं माझ्या पप्पांची काळजी घ्यावी
मराठा समाजाने ओबीसीत आरक्षण मागू नये. आता कुठे आम्हाला शिक्षणातलं कळायलं लागलं, त्यात आता पुढे जाताना अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. मनोज जरांगे यांनी त्यांची मागणी मागे घ्यावी. महाराष्ट्रात आमचाही विचार केला पाहिजे. माझ्या वडिलांनी ओबीसीसाठी अनेकदा आंदोलन केले, उपोषणाला पहिल्यांदा बसले आहेत. वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. समाजानं त्यांची काळजी घ्यावी. मराठा ओबीसी यांच्यात जातीवाद नको, फुले शाहू छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जातीय वाद ठीक नाही. जातनिहाय जनगणना सरकारने करावी. माझ्या वडिलांनी जी काही मागणी केली आहे त्याबाबत सरकारने लवकरात लवकर विचार करून त्यांचे उपोषण सोडवावं असं नवनाथ वाघमारे यांच्या मुलीने माध्यमांसमोर म्हटलं आहे.