OBC Leader Laxman Hake Replied Sambhaji Raje: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. तर कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत आहे. त्यामुळे ही प्रमाणपत्रे रद्द करावीत, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी दोन किमी अंतरावर वडीगोद्री येथे ओबीसी समाजाने आंदोलन, उपोषण सुरू केले आहे. याचे नेतृत्व लक्ष्मण हाके करत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावरून लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजेंवर जोरदार टीका केली आहे.
१७ सप्टेंबरपासून उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असून, संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची आज भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीबद्दल संभाजीराजेंनी चिंता व्यक्त केली. ही काय पद्धत आहे? तिकडे (सरकारकडे) मेडिकल रिपोर्ट जातो. मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे. काहीही होऊ शकतं. त्याला तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा संभाजीराजेंनी महायुती सरकारला दिला. यानंतर लक्ष्मण हाकेंनी संभाजी राजेंवर जोरदार हल्लाबोल केला.
संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायची लाज वाटते, रयत राजा मानणार नाही
छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य निर्माण होण्यासाठी अठरापगड जातींनी जीवाची पर्वा केली नाही. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. संभाजीराजे छत्रपती यांना शोषितांचा कळवळा नाही. मनोज जरांगे यांचे आंदोलन राजकारणासाठीच आहे. मराठवाड्यातील बारा बलुतेदारांच्या दुकानावर हल्ले झाले, नाभिक समाजाच्या लोकांच्या दुकानांवरती हल्ले झाले, हे कशात बसते? संभाजी राजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू राजांचे आणि शिवरायांचे वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही, या शब्दांत लक्ष्मण हाके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, मिस्टर संभाजी भोसले विशाळ गडावरती माझ्या मुस्लिम माता-माऊली लढत होत्या, तेव्हा तुम्ही हात वर करून चिथावणी देत होता. त्या जरांगेंनी त्याच्या बॅनर छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा वापरली आहे का? आम्ही एका जातीची मागणी करत नाही. संभाजी भोसले तुम्हाला आम्ही राजे का म्हणायचे? छत्रपती शिवरायांच्या शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असता तर तुम्ही या आंदोलनात भेट दिली असती. इथून पुढे ओबीसीची जनता तुम्हाला राजा म्हणणार नाही, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.