Laxman Hake News: आताच्या घडीला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आणि मराठा समाज आपापल्या भूमिकांवर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके ठाम आहेत. तर काही झाले तरी ओबीसीतून आरक्षण मिळावे. सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, असा आग्रह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धरला आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके राज्यभरात विविध ठिकाणी दौऱ्यावर आहेत. या विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडणार असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला होता. यावर लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली.
या लोकांना उत्तर द्यायचे मला वाईट वाटते. मराठा समाजात एवढ्या अभ्यासकांनी जन्म घेतला आहे, असे वाटतेय की सरकार पक्षानेच हे लोक पेरले आहेत. मराठा आरक्षणाचे मारेकरी हेच लोक आहेत की काय? यांची पार्श्वभूमी बघितली तर हे सत्ताधारी पक्षाचेच आहेत, अशी टीका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली. यानंतर लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांना उत्तर दिले.
...याचे उत्तर जरांगेंनी द्यायला हवे
या महाराष्ट्रामध्ये अशांतता कोणी निर्माण केली आहे, बीडमधील जाळपोळ, भगवान गडावर दगडफेक करण्याचा प्रयत्न कोणी केला? एका बाजूला अशांतता निर्माण करायची आणि पुन्हा तेच शांतता रॅली काढणार या काय म्हणायचे, याचे उत्तर जरांगे यांनीच द्यायला हवे. कायदा व सु्व्यवस्था या महाराष्ट्रात आहे. जेव्हापासून महाराष्ट्रात जरांगे पाटील यांची आंदोलने सुरु झाली तेव्हापासून त्यांचा एकच कार्यक्रम आहे की, भुजबळांना बदनाम करणे. भुजबळ कसे खलनायक आहेत अशा पद्धतीचे वातावरण त्यांनी निर्माण केली जात आहे. जरांगे पाटील हे त्यांचे आंदोलन संपेपर्यंत टीका करतच राहणार, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा
महाराष्ट्रातील १८ पगड जातीतील लोकांनी एकत्र येत आपल्या न्याय, हक्कासाठी लढाई उभी केली पाहिजे. ओबीसी एकत्र आहेत. एकत्र येत आहेत. या महाराष्ट्रात जरांगे पाटील कोणाचे आमदार पाडणार आहे, त्याचा ओबीसींवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा आहेत, असा पलटवार लक्ष्मण हाके यांनी केला.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी धनगर समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. सगळे नेते ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे, यासाठी आमच्या सर्व नेत्यांचे एकमत आहे, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.