सांगली: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून एकीकडे मनोज जरांगे पाटील लढा देत आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या मागण्यासाठी लक्ष्मण हाके सुद्धा मैदानात उतरले आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाही. अशातच येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला समर्थन करणारे ५० टक्के आमदार विधानसभेत पाठवणार, या मनोज जरांगे यांच्या घोषणेचं स्वागत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.
सांगलीत ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी लक्ष्मण हाके हे सांगलीत आले होते. यावेळी लक्ष्मण हाके यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ओबीसी आरक्षणावर शब्दही न उच्चारणाऱ्या आमदारांना मनोज जरांगे पाडणार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं आता लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
ओबीसी आरक्षणाच्या बाजूने या महाराष्ट्रातील कुठलाही आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणाबाबत बोलायला तयार नाहीत. मग या सगळ्या लोकांना जर जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. कारण ही माणसं पराभूत झाली पाहिजे असं आमचंही मत आहे, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
याचबरोबर, ओबीसी आरक्षणाच्या मागणीच्या पाठिंब्याबाबत जर लोकप्रतिनिधीनींनी जर योग्य निर्णय घेतला नाही तर ओबीसी समाजही लोकप्रतिनिधीच्याबाबत निर्णय घेतील अशी भूमिका मराठवाड्यातील बैठकीत घेण्यात आल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले. तसंच, पश्चिम महाराष्ट्रामध्येही लवकरच निर्णय घेऊ, असंही लक्ष्मण हाके यांनी सांगितलं.