OBC Vs Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंबड येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मराठा समाजाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला मनोज जरांगे यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे यांच्या पाठीशी मोठी राजकीय शक्ती उभी असल्याचा मोठा दावा ओबीसी नेत्यांनी केला आहे. तसेच छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले जात आहे. मग आम्ही शांत कसे बसू, अशी विचारणा ओबीसी नेत्यांकडून केली जात आहे.
माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांच्या निवासस्थानी ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीस प्रकाश शेंडगे यांनी मार्गदर्शन करताना मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा अधिक चर्चिला जात आहे. मनोज जरांगे पाटील हे ओबीसीच्या समर्थनार्थ बोलणाऱ्यांवर आरोप करत आहेत. ओबीसीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप करून निवडणुकीत पाडण्याची भाषा केली जात आहे. ओबीसी समाजाची बाजू छगन भुजबळ लावून धरत असल्याने त्यांना लक्ष केले जात आहे. मग आम्ही शांत कसे बसणार, असा उलटप्रश्न शेंडगे यांनी केला.
मनोज जरांगेंच्या पाठिमागे कोणाचा तरी राजकीय वरदहस्त
मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कुठली तरी राजकीय शक्ती उभी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, आगामी काळात निश्चित त्यांच्या मागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे हे पुढे आल्याशिवाय राहणार नाही, असा दावा शेंडगे यांनी केला. दुसरीकडे, संविधानाच्या चौकटीत राहून ओबीसी- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊ शकतो. मात्र दोन्ही समाजाला झुंजवण्याचे कारण काय, असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यांवर माजी खासदार संभाजीराजे यांनी टीकास्त्र सोडले असून, स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणे लावण्याचे पाप करत आहेत असा आरोप केला आहे. राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का, असा खडा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला असून छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.