आज मुंबईत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची ओबीसी आरक्षणाच्या आंदोलन कार्यकर्त्यांनी भेट घेतलेली असतानाच तिकडे जालन्यात अंरवाली फाट्यावर उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी भेट घेतली आहे. हे तिन्ही नेते सत्तेत असून लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा जोरदार फटका बसल्यानंतर ओबीसी नेते एकत्र येऊ लागल्याचे चित्र आहे.
भुजबळ यांनी आपणही हाकेंसोबत उपोषणाला बसणार असल्याचा शब्द कार्यकर्त्यांना दिला आहे. तर पंकजा मुंडे यांनी हाकेंची भेट घेत सरकारकडेच मागणी केली आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. हाके यांची तब्येत खालावत आहे.ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे आम्हाला पहिले सांगा. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, असे त्या म्हणाल्या आहेत.
धनंजय मुंडे यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधत हाके यांच्याशी चर्चा केली. दरम्यान उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या सरकारपर्यंत मांडणार आहे. आमचा कुणाला कुठल्याही गोष्टी देण्याला विरोध नाही. सरकारकडे उपोषणकर्त्यांच्या मागण्या मांडणार आहे. अशी वेळ महाराष्ट्रात कधीच कुणावर येवू नये, असे धनंजय मुंडेंनी म्हटले.