OBC And Maratha Reservation: राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी ठाम भूमिका घेतली असून, शांतता रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. यातच विधानसभा निवडणुकीत ११३ आमदार पाडणार असून, लवकरच त्यांची नावे सांगणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. यावर आता या विधानसभा निवडणुकीत १६० मराठा आमदार पाडू, असा इशारा ओबीसी आंदोलकांनी दिला आहे.
मनोज जरांगे अनेकवेळा म्हणाले की, मराठा समजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर आम्ही २८८ उमेदवार उभे करणार आहोत. आहो आधी ८८ उमेदवार तर उभे करा आणि त्या उमेदवारामधून फक्त ८ उमेदवारच निवडून आणा. निवडणुकीच्या मैदानात या आणि निवडणुका लढवा. माझे तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभेच करुन दाखवा, असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले होते. यानंतर आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे.
ओबीसी समाज राज्यभरात मराठा आमदारांना पाडण्याची भूमिका घेईल
आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा करणार असतील तर ओबीसी समाजही राज्यभरात मराठा आमदारांना पाडण्याची भूमिका घेईल. जर भुजबळ यांना पाडण्याची भाषा केली जात असेल तर १६० मराठा आमदार पाडण्याची भूमिका ओबीसी समाज घेऊ शकतो. सरकारने सगेसोयरेचा जीआर काढला तर सरकारचे सर्व आमदार पाडू. राज्य सरकारने नव्याने वाटप करण्यात आलेले कुणबी दाखले रद्द करावेत, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली.
दरम्यान, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले आहेच. आता राहिलेल्या आरक्षणावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मनोज जरांगे शिवीगाळ करतात, शिव्याचा उगम भटक्या वस्त्यावाड्यांवर होतो. मनोज जरांगे दररोज नवनवीन मागण्या करत आहेत. मनोज जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षणाचा अट्टहास केला तर मात्र आमचा विरोध कायम असेल, असे ते म्हणाले.