मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील अनाधिकृत भोंगे उतरवण्याची मागणी केली. सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत अन्यथा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू अशा इशारा दिला होता. राज ठाकरेंनी ४ मे पर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला होता. राज ठाकरेंच्या अल्टीमेटमनंतर गृह खात्याने मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवली. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र मनसे कार्यकर्ते अल्टीमेटमवर ठाम राहिले.
४ मे रोजी पहाटे काही ठिकाणी अजानवेळी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली. कांदिवलीच्या चारकोप भागात असणाऱ्या मशिदीवरील अजान सुरू होताच हनुमान चालीसा लावण्यात आली. वाशिममध्येही अजान सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यावर हनुमान चालीसा लावली. नवी मुंबईत हनुमान चालीसा लावण्यात आली. तर ३ मे रात्री उशीरा मुंबापुरीत मनसे कार्यकर्त्यांनी दर्ग्यासमोर हनुमान चालीसा लावण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरले होते.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार जळगावात मनसैनिकांनी आज सकाळी सहा वाजेनंतर शनी मंदिरात आरती करत हनुमान चालीसा म्हटली. या कार्यक्रमासाठी मनसैनिकांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली होती. पोलीस प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहून मनसैनिकांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडला नाही. जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावर असलेल्या शनी मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, आज पहाटे मशिदीवरील भोंग्याचा आवाज आला नाही, असा दावाही मनसैनिकांनी यावेळी केला. कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने काल रात्रीच मनसैनिकांना नोटीस बजावल्या होत्या. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
देशात इतकी कारागृहं नाहीत की...
तुम्ही धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. ४ मे रोजी ज्या ज्या मशिदींच्या भोंग्यांमधून अजान, बांग ऐकू येईल, त्या त्या मशिदींसमोर हनुमान चालिसा लावा. काय त्रास होतो, ते त्यांनाही कळू दे, अशा शब्दांत राज यांनी इशारा दिला आहे. एका पत्राच्या माध्यमातून राज यांनी सर्व हिंदूंना मशिदीवरील भोंग्यांविरुद्ध संघर्ष करण्याचं आवाहन केलं आहे.